सह्याद्रीच्या कुशीतील भैरवनाथ गडाची अनामिक सफर!

भैरवनाथ गडाची सफर अनामिक ओढीने मी चढते डोंगर माथा l ढग उतरती खाली मज आलिंगन द्याया l
पावसाचे थेंब हे चुंबती रोम-रोम माझे l
निसर्गातून दिसे मनमोहना रूप तुझे l
सह्याद्रीच्या अथांग पर्वत रांगेत निधड्या धातीने उभा ठाकलेला भैरवनाथगड या गडावर आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भैरवनाथ देवस्थान हे अकोले तालुक्यातील शिरपुंजे या गावी आहे.दर रविवारी भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे येत असतात.त्या भाविक भक्तांपैकी मी एक रविवारचा दिवस सकाळच्या प्रहरी भैरवनाथ गडाजवळ पोहोचले
समोर महाकाय डोंगर पाहून अंगावर शाहारे आले पण मनाने निश्चित केला की आपण काहीही झाले तरी गड सर करायचाच आणि गड चढायला सुरूवात केली.प्रथम वीस ते एकवीस पायऱ्या चढल्या असतील त्यानंतर अतिशय खडतर वाटेने प्रवास सुरू झाला.हळु-हळु अर्धा गड काबीज केलेल्यावर मागे वळून पाहिले तर अंग शहारले,डोळे गरगरु लागते पण धीर सोडला नाही पुन्हा जोमाने चढायला सज्ज त्या महाकाय कातळावर प्रचंड अवघड ठिकाणी पायऱ्या कोरल्या आहेत.मनात प्रश्न निर्माण झाला की या महाकाय कातळावर पायऱ्या कोणी कोरल्या असतील व किती दिवस लागले असतील ?

जवळजवळ दोन तासांच्या खडतर प्रवासा नंतर गडावर पोहोचले.पाहते तर काय एक आश्चर्याचा धक्काच बसला त्या महाकाय कातळावर पाण्याचे टाके -हौद कोरलेले दिसले.मनात विचार आला हजारो वर्षी पूर्वीचे हे काम दिसते पण हे कोणी व किती दिवसात केले असणार धन्य त्या शूरवीर कारागीरांचे की त्यांनी निर्माण केलेल्या हौदात स्वच्छ पाणी पाहायला मिळाले .पाणी पिऊन पाहिले तर माठातील पाण्याला लाजवील इतके थंडगार पाणी.थोड्या विश्रांतीने मंदिराकडे गेले तर डोळ्याचे पारणेच फिटले

इतके सुंदर डोंगरात कोरलेले मंदिर आणि त्याच कातळात कोरलेली पाषाण मूर्ती घोड्यावर स्वार झालेले भैरवनाथ पाहून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.दर्शन घेऊन पुन्हा गडावर फेरफटका मारला तर अनेक हौद दिसले काही अजूनही सुस्थितीत आहेत तर काही भग्न अवस्थेत आहेत.गडावरुन संपूर्ण आदिवासी भाग निसर्गाने नटलेला पाहायला मिळतो.संपूर्ण भटकंती झाल्यानंतर गड खाली उतरण्यास सुरूवात केली. डोळे गरागर फिरू लागले,पायात गोळे येऊ लागले पण भैरवनाथाच्या शक्तिच्या जोरावर मी हळूहळू खाली परतले नी आपोआपच गडाकडे पाहत हात जोडले गेले.
शब्दांकन-कल्याणी घोंगडे