समाजाला मदत करण्याची भावना नव्या पिढीत रुजविण्याची गरज
- प्रेरक व्याख्याते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी
नाशिक : दैनंदिन जीवनात यश म्हणजे केवळ संपत्ती, पैसा नसून लहान लहान सामाजिक योगदानातूनदेखील लाख मोलाचा आनंद मिळविता येतो याची अनुभूती प्रत्येकाने घ्यायला हवी. दुसऱ्याच्या सुखात, प्रगतीत, आणि उत्कर्षात आपला आनंद मानणे हा विचार रुजविण्याची गरज आहे. परमेश्वराने दिलेल्या अदभूत शक्तीचा वापर करा. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करा. जीवनात नेहमी सकारात्मक रहा, आनंदी रहा, प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल भाव निर्माण करा. आपल्या सामाजिक दायित्वातूनच खऱ्या श्रीमंतीचे दर्शन मिळते. समाजाला मदत करण्याची भावना नव्या पिढीत रुजविण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रेरक व्याख्याते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने शहरातील विविध शाळांतल्या ६ हजार दृष्टीबाधित विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून, त्यांना उत्तम दर्जाचे चष्मे देण्याच्या उपक्रमाच्या मदतनिधीसाठी महाकवी कालिदास कलामंदिरात प्रेरक व्याख्याते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांचे ‘गिव टू गेन’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी नारायण मंदिरचे प्रमुख महाव्रत स्वामी, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत, कार्यक्रम समितीचे प्रमुख विजय दिनानी उपस्थित होते.
डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांच्या प्रेरक विचारांची अनुभूती नाशिककरांनी घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपले शिक्षण, अनुभव आणि कला आपल्या प्रगतीला केवळ १५ टक्के मदत करू शकतात. उर्वरित ८५ टक्के प्रगतीचे कारण म्हणजे आपले लोकांशी असलेले मानवी नाते असते. जीवनात आपली नीती, आचार, नियम आणि तत्त्वे कधीही सोडू नका. आपल्या वर्तनात नेहमी नम्रता आणि विवेक असायाला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले. जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे असे सांगून आजकाल बहुतेकांची मानसिकता घेण्याची बनली आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच घेण्याची भावना असल्याने मानवी जीवन संकुचित बनले आहे. अशा संकुचित जीवनशैलीला बाजूला सारून आपण समजाचे देणे लागतो ही भावना अंगी कारायला हवी असे ते म्हणाले. रोटरी संस्थेच्या उज्वल दृष्टी अभियानाचेही त्यांनी कौतुक केले.
………
चौकट –
तर प्रत्येकाला अन्न, वस्र, निवारा मिळेल
यावेळी बोलताना डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी जागतिक घडामोडींकडेही लक्ष वेधले. जगातल्या सर्व देशांची संरक्षणविषयक अर्थसंकल्पीय तरतूद काही हजारो कोटी रुपयांची आहे, शांतता प्रस्थापित करून ही तरतूद सर्वांनी एकत्र येत निम्म्यावर आणली तर, बचत होणाऱ्या रकमेतून जगभरातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा पुढील पाच वर्षात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
……..
उज्वल दृष्टी अभियानाच्या उपक्रमासाठी घेतलेल्या या कार्यक्रमात डॉ. ज्ञानवत्सल स्वामी आणि प्रायोजकांच्या हस्ते मखमलाबाद शाळेच्या मुलांना प्रातिनिधिक स्वरुपात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, उपेंद्रभाई दिनानी, प्रदीप कोठावदे, डॉ. स्वप्नील बच्छाव, मोहन बागमार, डी. जे. हंसवाणी, कौशिकभाई पटेल, साबद्रा श्रेणिक, मनोनीत प्रांतपाल आशा वेणुगोपाल, अनिल सुकेणकर, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. हितेश बुरुड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी स्वामींचा परिचय करून दिला. सचिव ओमप्रकाश रावत यांनी उपस्थितांचे आभार मानले.