महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी अॅड. किरण कदम यांची निवड;

रुग्ण हक्क परिषदेकडून कदम यांचा सत्कार!!
दत्ता ठुबे
पुणे – बहुजन वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनचे महत्व आणि वकिलांच्या मनात असलेले स्थान सर्वत्र प्रसिद्ध आहे. बहुजन वकिलांची मोठी संघटना असलेल्या या महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी पुण्यातील सुप्रसिद्ध वकील आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अॅड. किरण कदम यांची नुकतीच निवड झाली.
भारिप बहुजन महासंघाच्या पुणे शहर अध्यक्षपदीही अॅड. किरण कदम यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील एक विद्वान कार्यकर्ते म्हणून ते राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी अॅड. किरण कदम यांची निवड झाल्याने रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने अॅड. कदम यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. शाल, मानपत्र, पुस्तकं आणि पुष्पगुच्छ देऊन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये – मारणे, केंद्रीय कार्यालय सचिव संजय जोशी, पुणे शहर उपाध्यक्ष यशवंत भोसले, दिलीप ओव्हाळ प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, बहुजन समाजाच्या वतनी जमिनींच्या संदर्भातील अॅड. किरण कदम यांनी केलेल्या कामामुळे हजारो भूमिहीन नागरिकांना त्यांच्या जमिनी पुन्हा परत मिळाल्या. वतनी जमिनीच्या बाबतीतील सर्वच प्रकरणात त्यांनी आशिलांना न्यायालयीन लढाईत जिंकून दिले आहे. सर्व सामान्य माणसाचे हक्क – अधिकार यासाठी अॅड. किरण कदम करत असलेल्या कामाची पावती म्हणूनच महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड ते सार्थ ठरवतील. पुण्यात सर्वपक्षीय ‘कार्यकर्त्यांचे’ वकील म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठीच आजचा सत्कार समारंभपूर्वक केला आहे.
अॅड. किरण कदम म्हणाले कि, बहुजन वकिलांची संघटना असलेल्या महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या पाठीशी रुग्ण हक्क परिषदेने उभे राहावे. वकिलांचे व वकिलांच्या कुटुंबातील अनेकांचे हॉस्पिटलचे लाखो रुपयांचे बिल माफ करण्यासाठीही रुग्ण हक्क परिषद व महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशन एकत्रितपणे तत्पर राहतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सत्कार आयोजित करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे आभार देखील अॅड. किरण कदम यांनी मानले.