इतर

1 मेपासून वाळू 600 रुपये ब्रास ; महसूलमंत्री विखे पाटील यांची घोषणा

शिर्डी : बांधकाम क्षेत्राचा प्राण असलेली वाळू जिल्ह्यात महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मेपासून केवळ 600 रुपये ब्रास या दराने मिळणार असल्याची घोषणा महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (दि. 14) केली. राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील 7 कोटी 78 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन शुक्रवारी विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. वाळूचा उपसा आणि वितरणाबाबत राज्य सरकारने नवे धोरण नुकतेच जाहीर केले होते.

त्या पार्श्वभूमीवर माहिती देताना विखे पाटील यांनी सांगितले, की आपल्या जिल्ह्यात 1 मेपासून सर्वांना सरकारी डेपोतून 600 रुपये ब्रास या दराने वाळू उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे 600 रुपयांत वाळू वाटप करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटनही विखे यांच्या हस्ते झाले. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील म्हणाले, महापुरुषांच्या आचार-विचारांनुसार कार्यकर्त्यांनी काम करावे. डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आपला देश जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. या वेळी विद्यार्थिनींना सायकली, तसेच अस्थिव्यंग विद्यार्थिनींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपअभियंता देविदास धापटकर, सरपंच ओमेश साहेबराव जपे, बाळासाहेब जपे आदी उपस्थित होते.

खंडकर्‍यांचा प्रश्न महिन्यात सोडविणार

सावळविहीर व परिसरातील खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये वर्ग करण्यात येतील, असेही विखे पाटील यांनी सांगितले. जमीन मोजणीची साडेतीन हजार प्रकरणे जूनअखेरपर्यंत निकाली काढून आपणास घरपोच नकाशे देणार आहोत, अशी ग्वाहीदेखील विखे पाटील यांनी या वेळी दिली.

तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत

नवीन होणारा ग्रीन फिल्ड कॉरिडार आणि समृद्धी महामार्गाचा मुंबई ते शिर्डी दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लॅडिंग सुरू झाले. तेथे नवीन टर्मिनल इमारत होणार आहे. सावळीविहीरला पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. तेथील सोनवाडीत पाचशे एकर जागेत लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क होणार आहे. यामुळे येत्या काळात परिसरातील तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता एकत्र येऊन स्वत:चे व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन विखे पाटील यांनी या वेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button