गुरुपौर्णिमा निमित्ताने भव्य पायी दिंडी सोहळा संपन्न

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी –
आद्य परमपिता परमात्मा स्वामी शिवानंद दादाजी आणि आद्य जगत जननी जगत माता धुनी द्वारिका मैया यांच्या कृपा आशिर्वादाने गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री.क्षेत्र गणेगाव दुमाला ता. शिरूर जि. पुणे ते क्षेत्र पिंपळनेर तालुका साक्री जि. धुळे येथे ही १५ दिवसाचा 350 कि. मी. अंतराचा भव्य पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरून हजारोंच्या संख्येने श्री दादाजी भक्त या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. या पायी दिंडीचे भव्य स्वागत पिंपळनेर नगरीमध्ये करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र सोहळ्या निमित्ताने आद्य परमपिता परमात्मा स्वामी शिवानंद दादाजींनी उपस्थित भक्त समुदायास आध्यात्मिक प्रवचन रूपाने मार्गदर्शन केले.
तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने श्री. क्षेत्र खांडवा येथून भजन सम्राट श्री ओम प्रकाश तिरोले व सहकारी यांच्या वतीने भव्य भजन सत्संग करून

श्री.दादाजी नामाचा जल्लोष करण्यात आला. तसेच या निमित्ताने सर्व दादाजी भक्तांना स्वामी शिवानंद दादाजी तसेच धुनी द्वारिका मैया यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ मिळाला. अनेक नवीन साधकांनी गुरुपौर्णिमेच्या दिनी अनुग्रह घेऊन आपले आत्मकल्याण केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री. महान 1008 धुनीवाले धनंजय सरकार जी यांनी केले तसेच पायवारी संपन्न होण्यासाठी संपूर्ण स्वामी शिवानंद दादाजी परिवाराने विशेष कष्ट घेतले. गुरुपौर्णिमा सोहळ्याची समाप्ती भव्य दिव्य सोहळ्यांनी करण्यात आली. संपूर्ण पिंपळनेर नगरी दादाजी नामाने दुमदुमली.
