इतर

पारनेर करांवरील जिझिया कर रद्द करण्यासाठी आंदोलन

दत्ता ठुबे/पारनेर :-

पारनेर नगरपंचायतीच्या हद्दीतील सदनिकांना अवास्तव जिझिया करासह शहरातील पाणीटंचाई व खासगी जागेवरील आरक्षण रद्द करण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 
माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक युवराज पठारे, अशोक चेडे, ऋषीकेश गंधाडे, शंकर नगरे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यासबंधीचे निवेदन नगरपंचायत प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर सातपुते, शंकर नगरे, विशाल शिंदे, बाळासाहेब शिंगवी, किरण कोकाटे, विजय कावरे, देवराम ठुबे, सचिन पठारे, सुभाष औटी, प्रकाश घोडके, अनिल भंडारी, विजय कावरे, मंगेश कावरे, विलास कटारिया, शेषमल बोरा, विठ्ठल औटी, रामा चेडे, भास्कर घोडके,   बाळासाहेब औंटी, प्रशांत पतके, संजय पतके, विलास तराळ, राम नाईक, दत्ता पुजारी, स्वप्निल बोरा, आशिष गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नगरपंचायत प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पारनेर नगरपंचायत हद्दीमध्ये १० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच नगरपंचायत विकास आराखडयामध्ये खासगी आरक्षण टाकलेले आहे. चालू वर्षीच्या नगरपंचायत हद्दीतील सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या करांची रक्कम मोठ्या प्रमाणात आकारली असून, ती कमी करावी. पाणी पुरवठा एक दिवसांच्या अंतराने पूर्ण दाबाने करावा. विकास आराखडयामध्ये खासगी जागांवर टाकलेले आरक्षण रद्द करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर पारनेर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन व अामरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांकडून शहरातील रहिवाशांना कर वसुलीची बिले देण्यात आली आहेत. त्यात अवास्तव कर आकारणी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिक्षण, रोजगार हमी, वृक्ष, घनकचरा असे कर लादल्याचे नमुद करून नगरपंचायती तर्फे एकही शाळा चालविली जात नाही. तरीही शिक्षण कर वसुली सुरू आहे. वृक्षारोपणाचे एकही काम नसताना वृक्ष कर आकारला आहे. रोजगार हमीचे काम सुरू नसताना कराची वसुली सुरू आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून घंटागाडीचे नियोजन नाही. 
अनियमितपणे घंटा गाड्या फिरविण्यात येतात असे असतानाही घनकचरा कर आकारल्याचे सांगण्यात आले. शहरातील पथदिवे बंद किंवा नादुरुस्त आहेत, ५ ते ७ दिवसांनी पाणी येत असून ते देखील गढूळ, खराब असून त्याचा वास खुप भयंकर येतो. पाणी पुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र सतत बंद तसेच नादुरूस्त असल्याने साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. सफाई कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक व धार्मिक स्थळांच्या परिसरात अस्वच्छता आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप करण्यात आला. शहरात महिला व पुरुष यांच्यासाठी स्वच्छता गृहांची उभारणी, नादुरूस्त स्वच्छता गृह दुरूस्त करणे, वर्षभरापूर्वी भूमिपूजन झालेली कामे अद्याप सुरू नसून ती सुरू करणे, शिवाजी रोडवरील खड्डे बुजविणे, भाजी मार्केट, मटण मार्केटच्या गाळयांचा लिलाव करून ते व्यापार्‍यांसाठी खुले करणे आदी मागण्या करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button