डाव्या चळवळीचे नेतृत्व एन.डी. पाटील यांच्या रुपाने हरपले -अॅड.कॉ. सुभाष लांडे

डाव्या संघटनांच्या वतीने
एन.डी. पाटील यांना अखेरचा लाल सलाम
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेतृत्व एन.डी. पाटील यांच्या रुपाने हरपले. आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी कामगारांसाठी त्यांनी लढा दिला. लाल झेंड्याशी बांधिलकी जपून गोरगरीब, कष्टकरी व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचल्याचे प्रतिपादन भाकपचे राज्य सहसचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी केले.
शहरात डाव्या पुरोगामी संघटनांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बुरुडगाव रोड येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या शोक सभेत भावना व्यक्त करताना लांडे बोलत होते. प्रारंभी एन.डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहून शेवटचा लाल सलाम करण्यात आला. यावेळी भाकपचे जिल्हा सहसचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. रमेश नागवडे, किसान सभेचे गंगाधर त्र्यंबके, शब्दगंधचे अध्यक्ष सुनिल गोसावी, प्रा. एल.बी. जाधव, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष फिरोज शेख, कॉ. रामदास वागस्कर, सतीश पवार आदी उपस्थित होते.
पुढे कॉ. लांडे म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी एन.डी. पाटील यांनी अविरत संघर्ष केला. सर्वसामान्य कष्टकरी वर्गांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी ते नेहमीच आघाडीवर होते. त्यांनी डाव्या चळवळीला दिशा देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा शेतकर्यांवर झालेल्या गोळीबारात सहा शेतकरी मृत्यूमुखी पडले होते. त्या घटनेला 2000 साली पन्नास वर्षे झाली म्हणून एरंडगावला भाकपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एन.डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. माधवराव गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. प्रा. एल.बी. जाधव यांनी एन.डी. पाटील यांची साधी व शिस्तप्रिय रहाणी होती. आपल्या तत्त्वांशी त्यांनी आखेर पर्यंत बाधिलकी ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, निस्वार्थपणे शेतकर्यांची बाजू घेऊन एन.डी. पाटील कायम लढत राहिले. सात दशक त्यांनी दिलेला संघर्ष एखाद्या वादळाप्रमाणे असून, त्यामुळे कष्टकरी, शेतकरी वर्गाला न्याय मिळण्यास मदत झाली. उपस्थितांनी आपल्या भाषणात एन.डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.