इतर

कृषी पुरस्कारांचे रविवारी मुंबईत वितरण सयाजीराव पोखरकर यांना कृषीभूषण…

अकोले:- महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या रविवारी मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी. आय केंद्रात संपन्न होत असून राज्याचे राज्यपाल महामहीम सी.पी.राधाकृष्णन यांचे शुभहस्ते सदरचा पुरस्कार दिला जाणार आहे.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे,महसूल मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासह अन्य मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.

यावेळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील कृषीतज्ञ व प्रयोगशील शेतकरी श्री.सयाजीराव पोखरकर यांनी शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या मानाच्या वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. श्री.पोखरकर हे स्वतः (एम.एस्सी.ॲग्री) आहेत. श्री.पोखरकर यांचा कोबी,टोमॅटो,आद्रक या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू,शेवंती,बिजली या फुल पिकांचा आणि ऊस शेतीचा विशेष अभ्यास आहे. इस्रायल आणि जॉर्डन या देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत.शेती क्षेत्रात चर्चासत्रे,प्रशिक्षण शिबिरे, शेतकरी मेळावे,प्रक्षेत्र भेटींच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसाराचे तसेच कृषी विस्ताराचे मोठे काम त्यांनी केले आहे. सहकारी दूध संस्था,सामाजिक,सांस्कृतिक,आणि शेती क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा निकटचा संबंध आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न,वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता महिला कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण,शेती मित्र व शेतीनिष्ठ शेतकरी तसेच डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवा रत्न या पुरस्कारांबरोबरच पीक स्पर्धा विजेत्यांचा यामध्ये समावेश आहे.पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख,सुवर्णपदक, स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र अशा प्रकारचे आहे.सन 2020 – 2021 / 2021 – 2022 व 2022 – 2023 या तीन वर्षातील प्रलंबित पुरस्कार यावेळी एकत्रित वितरित करण्यात येणार असून पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार सोहळा येत्या रविवारी पार पडणार आहे.
या पुरस्काराबद्दल श्री.सयाजीराव पोखरकर यांचे शेती क्षेत्रासह सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button