पोस्टर मेकिंग स्पर्धेत नाशिकमधील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक प्रतिनिधी
वर्ल्ड स्पेस वीक २०२४ च्या निमित्ताने, अशोका स्पेस ट्युटर आणि अशोका ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, अर्जुन नगर शाखेने रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत नाशिकमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ही स्पर्धा १० ऑक्टोबरला, इयत्ता ३री ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली होती. स्पर्धकांसोबत पालक वर्गही तितकाच उत्साहाने सहभागी झाला होता. उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक निवडण्याचे विशेष कार्य नाशिकच्या ख्यातनाम आर्टिस्ट श्री सिद्धार्थ धारणे यांनी केले.
या स्पर्धेत आर. के. कलानी, विजडम हाय, सिंधू सागर अकॅडमी, ग्लोबल व्हिजन, मराठा विद्याप्रसारक, व्हाईट लिली स्कूल आणि अशोका या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट्स, आणि अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश रावत, सचिव प्रकल्प श्री हेमराज राजपूत, सचिव प्रशासन शिल्पा पारख, आणि इंटरॅक्ट क्लबच्या संचालक सौ. अदिती अग्रवाल उपस्थित होत्या. अशोका युनिव्हर्सल स्कूल इंटरॅक्ट क्लबच्या सल्लागार सौ. अर्चना येवले यांनी अत्यंत कौशल्याने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले, त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिकने अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुन नगर शाखेचे आणि अर्चना मॅडम यांचे मन:पूर्वक आभार मानले. रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि अशोका अर्जुन नगरच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.