ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलेंडर ६२ रूपयांनी महागला;
.
नवीदिल्ली- देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑइलने एक नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. ऐन सणासुदीत व्यावसायिक गँस महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झालेला नाही.
तेल कंपन्या दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी गॅल सिलेंडरचे नवे दर जारी करतात. त्यानुसार आज तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1740 रुपयांनी वाढून 1802 रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये 1850 रुपयांनी किंमत वाढून 1911.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईत 1692.50 रुपयांनी वाढून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1754.50 रुपये इतकी झाली आहे. चेन्नईत 1903 रुपयांनी वाढून 1964.50 रुपयावर पोहचली आहे. ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती. मागच्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना दिलासा म्हणजे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
जुलै 2024 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी तेल कंपन्यांनी LPG किमतीत कपातीची भेट दिली होती. मात्र पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरला महिन्यातही सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला. ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाब्यांच्या खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट्समधील जेवणाचे दर वाढू शकतात.