इतर

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आमदार झिरवाळ व इंदोरीकर महाराजांची फुगडी रंगते तेव्हा

अकोले /प्रतिनिधी

तालुक्यातील इंदोरी येथे हरीनाम सप्ताहात रंगलेली विधानसभेचे माजी उपाध्यक्ष , दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांची फुगडी चर्चेचा विषय ठरली आहे.समाज माध्यमात या फुगडीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

तालुक्यातील इंदोरी हे निवृत्ती महाराजांचे मूळ गाव .आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ते दरवर्षी इंदोरी येथे ‘मातृ पितृ’ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करीत असतात.या वर्षीचा हा सोहळा सध्या सुरु आहे.

अकोले तालुक्यात काही कारणाने आलेल्या नरहरी झिरवाळ यांनी नुकतीच या सोहळ्याला सदिच्छा भेट दिली. मुळात वारकरी भजनाची आवड असलेले व अगोदर भारुड , नाटक यामध्ये भूमिका करून गावोगावी आपल्या विनोदी शैलीतून वारकरी परंपरेच्या भारुडाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केलेले असल्याने  आमदार झिरवाळ यांच्या मध्ये वारकरी संप्रदायाबद्दलची एक ओढ कायम शिल्लक आहे.त्या मुळेच आपल्या अकोले दौऱ्यात त्यांनी  वारकरी संप्रदायातील आपल्या विनोदी शैलीच्या प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व दूर प्रसिद्ध असलेले इंदोरीकर महाराज यांच्या माता पित्यांच्या कृतज्ञता सोहळ्यात किर्तन महोत्सवात  आवर्जून भेट दिली. ते महोत्सवाचे ठिकाणी पोहचले तेव्हा  शेकडो  वारकरी हरिपाठ करत होते.

 सर्व उपस्थित वारकऱ्यांचा आग्रह म्हणून इंदुरीकर महाराज व आमदार झिरवाळ  यांनी नाचून टाळ मृदंगाच्या तालावर फुगडी खेळली. अबालवृद्धांच्या वारकऱ्यांमध्ये हि फुगडी चर्चेचा विषय ठरली . इंदुरीकर महाराजांनी आपल्या या राजकीय क्षेत्रातील सांप्रदायिक मित्राचा फेटा बांधून सन्मान केला. याप्रसंगी अगस्ति देवस्थान  ट्रस्टचे विश्वस्त दिपक महाराज देशमुख, रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य,आ. झिर वाळ यांचे स्वीय सहाय्यक सचिन वैद्य,हभप किरण महाराज शेटे, सौ.शालिनीताई देशमुख इंदुरीकर, दत्तात्रय अस्वले ,  ज्ञानेश्वर माऊली आरोटे, उद्योजक अशोक सावंत ,अशोक धुमाळ, संतोष नवले ,रवी देशमुख, अशोक कडलग, शिवाजी हासे,गणपत रुकारी यासह अनेक वारकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button