इतर

बदलापूर नगरीत रत्नागिरी- सिंधुदुर्ग वासियांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न..!

प्रतिनिधी- डॉ शाम जाधव


रविवार दिनांक १९जानेवारी रोजी बदलापूर पूर्व येथील श्रीजी सभागृहात, बदलापूर शहरात राहणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासीयांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंडळाच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून , आणि नंतर कोकणातील पद्धतीप्रमाणे म्हणजेच म्हणजेच देवाला गाऱ्हाणे घालून सुरुवात करण्यात आली. कार्याध्यक्ष महेश सावंत यांनी उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक स्वागत करताना कोकणच्या आमच्या साध्याभोळ्या माणसांनी आपल्या कर्मभूमीचे आणि जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकजूट होऊन काम करायला पाहिजे अशी भावनिक साद दिली. मंडळाच्या सहसचिव सौ. आशा पालव यांनी प्रास्ताविक करताना मंडळाच्या २३ वर्षाच्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे दाखले देत, येणाऱ्या काळात मंडळाची कशाप्रकारे वाटचाल करायचा मानस आहे याची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी बोलताना मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. विजय सावंत यांनी कोणतेही सामाजिक कार्य यशस्वी करायचे असल्यास सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. माजी सचिव श्री. रमेश मरगज यांनी मंडळाचे सर्व सदस्य कसे एकमेकांना सहाय्य करतात याचे अनेक दाखले देत, आपले मंडळ नेहमीच सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी येणाऱ्या काळात आम्ही मंडळाचा नक्कीच विस्तार करू आणि मंडळाच्या सदस्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी सुद्धा अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवू याचे ग्वाही दिली. मंडळाच्या नवीन कार्यकारिणी समितीत अध्यक्ष तसेच बहुतांश सदस्य महिला आहेत याचा अभिमान व्यक्त करतानाच, स्त्रीशक्तीला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणे , महिला सशक्तिकरण करणे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो कोकणवासीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झाले. सदर कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गुणगौरव तसेच विशेष कार्य केलेल्या यशस्वीतांचा गुणगौरव करण्यात आला. मंडळासाठी अनेक वर्ष कार्य करणाऱ्या सुरेश सावंत, सदानंद चव्हाण , मुग्धा नार्वेकर, सुनिता राणे या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व लोकांना अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या मुलांच्या नृत्यकलेने कार्यक्रमाला जबरदस्त रंगत आली. विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले . त्याचवेळी स्त्रियांचे आकर्षण असणाऱ्या पैठणी स्पर्धेतही अनेक स्त्रियांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदित महिला व्यवसायिकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमास बदलापूर शहरातील श्री. प्रकाश पाटील, सौ. प्रियांका दामले, सौ. राजश्री घोरपडे, श्री.प्रवीण राऊत, सौ.शितल राऊत, श्री.सूरदास पाटील, श्री.बाळासाहेब कांबरी, गणेश राणे इत्यादी मान्यवर व्यक्तींनी आवर्जून भेट दिली. याप्रसंगी बोलताना मा. प्रवीण राऊत यांनी कोकणी माणसांचे आणि राऊत कुटुंबीयांचे ऋणानुबंध किती दृढ आहे याचे भावनिक वर्णन सर्वांसमोर मांडले. मा.शितल राऊत यांनी कोकणवासीय नेहमीच सगळ्यांशी कसे जुळवून घेतात आणि नेहमीच इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असतात याची अनेक उदाहरणे दिली आणि आमचा आणि कोकणवासीयांचा हा ऋणानुबंध आम्ही सदैव टिकू याची ग्वाही दिली. याप्रसंगी बोलताना मा. श्री.संभाजी शिंदे यांनी कोकण वासीयांनी एकजूट होऊन आपली स्वतःची एक भव्य वास्तू बदलापूर शहरात उभारायला हवी आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू याची जाहीर ग्वाही सर्वांसमोर दिली. यालाच दुजोरा देत माननीय श्री.बाळासाहेब कांबरी यांनी कोकणवासी यांचे कोकण भवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. श्री सूरदास पाटील यांनीही कोकणातील माणसे आणि आम्ही स्थानिक यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. ही सर्व माणसे नेहमीच आमच्या अडीअडचणीसाठी आमच्या पाठीशी उभी राहतात आणि आम्हीही सदैव तुमच्या सोबत असू याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.अरविंद सावंत, श्री.दत्तात्रय पोसम,श्री.विजय सावंत, श्री.चंद्रकांत पाटील, माजी सचिव श्री. रमेश मर्गज, श्री.मंगेश कदम, श्री.विजय परब, सौ सुवर्णा कदम, श्री.आबा बांदेकर, श्री दत्ताराम गोवळकर इत्यादी अनेक माजी पदाधिकारी तसेच मंडळाच्या कार्यकारणी समितीतील गिरीश राणे, महेश सावंत, अनिता सावंत, आशा पालव, श्रावणी पवार, भावना परब, अंकिता सदडेकर, गुरुनाथ तिरपणकर, श्रद्धा मिस्त्री, शमिका मुणगेकर, अर्चना राणे आणि अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह आणि आपुलकीने भरलेल्या या रंगतदार कार्यक्रमाची, रुचकर स्नेहभोजनाने आणि पुढच्या वर्षी अधिक भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्याचे आश्वासन देऊन सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button