उडान- २०२५’ पथनाट्य स्पर्धेत अथर्व साठे लिखित ‘स्वयंप्रकाशित’ पथनाट्य द्वितीय !

दि. २ फेब्रुवारी २०२५ – मुंबई विद्यापीठ आयोजित ‘उडान- २०२५’ ही पथनाट्य स्पर्धा गुरू नानक कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सायन, मुंबई येथे नुकतीच पार पडली .
या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत अथर्व साठे लिखित ‘स्वयंप्रकाशित’ या पथनाट्याला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवनाथ आले आहे. गुरुनानक कॉलेज, जि. टि. बी. नगर, सायन यांनी हे पथनाट्य सादर केले .स्पर्धेमध्ये एकूण २७ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. अतिशय चुरशीच्या राहिलेल्या या स्पर्धेत ‘स्वयंप्रकाशित’ ने बाजी मारली .
अभ्यासपूर्ण व अर्थपूर्ण लिखाण यासाठी अथर्व साठे यांचे लिखाण कलाक्षेत्रात लक्षवेधक ठरत आहे. वाढते शहरीकरण व तरुणांचा शहराकडे वाढत असलेला ओढा यामुळे शहरांवर येणारा अतिरिक्त ताण यावर आधारित हे पथनाट्य सादर करण्यात आले होते. चहूबाजूंनी वाढत चाललेला शहरांचा फुगवटा, नैसर्गिक संसाधनांची गळचेपी व वाढत्या स्पर्धेमुळे तरुणांच्या हाती येणारी हतबलता या प्रश्नांवर कुठले उपाय प्रभावी ठरू शकतात या विषयांना अलगत हात घालत उत्कृष्ट पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. शहरांची सूज कमी करून लोकसंख्येचे विकेंद्रीकरण कसे करता येईल यावर कृतिशील उपाय सांगून तरुणांना जागृत करणे असा पथनाट्याचा आशय होता.
या पथनाट्याचे दिग्दर्शन सागर गावंड यांनी केले. श्वेता पाटिल यांनी विशेष मार्गदर्शन केले . या अगोदरही अंतर महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये अथर्व साठे यांनी आपल्या लिखाणाची छाप सोडली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.