दापूरचे बालकला साहित्य संमेलन राज्यातील शाळांसाठी आदर्शवत: डॉ. संतोष साबळे

सिन्नर: रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालयात तेराव्वे बालकला साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवी मध्ये शिकणारा समाधान प्रताप आव्हाड याची निवड करण्यात आली होती. विद्यालयातील वातावरण बाल सारस्वतांची मांदियाळी भरली होती. सकाळपासूनच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण या कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीमध्ये भरले होते. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली.

यावेळी प्रमुख मान्यवर साहित्यिक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक डॉ. संतोष साबळे (यांचा इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ अभ्यासक्रमासाठी आहे.) यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीरामशेठ आव्हाड, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहन शेठ काकड, तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड, गणेश विठोबा आव्हाड, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एस पी आव्हाड, विद्यालयाचे

मुख्याध्यापक श्री. गुंजाळ बी. बी., पर्यवेक्षक श्री. सय्यद ए.बी.,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी दराडे,पी. डी. दराडे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तू आव्हाड, भाऊसाहेब कांदे,अर्जुन आव्हाड, बाळासाहेब आव्हाड,योगेश आव्हाड,अमोल आव्हाड, माजी सरपंच रमेश आव्हाड, वासुदेव आव्हाड, भगवान आव्हाड,सनराईज रुरल फाउंडेशन चे पदाधिकारी गणपत घुले, बेदाडे साहेब, सागर आव्हाड वरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.
यावेळी संपूर्ण गावातून ग्रंथदिंडीची फेरी काढण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांनी पारंपारिक विविध रंगी वेशभूषा परिधान करत लोकसंस्कृतीचा जयघोष संपूर्ण गावात दुमदुमून सोडला होता. मराठी भाषेचा गौरव आणि अभिजात मराठी भाषा यासंबंधी विविध फलक तयार करण्यात आले होते. टाळकरी, वारकरी वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान करत टाळ मृदुंग यांच्या ठेक्यावर अभंग म्हणत संतांची परंपरा अधोरेखित केली.
संमेलनाचे उद्घाटन लेखक डॉ. संतोष साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
संमेलनाचे प्रास्ताविक विद्यालयातील मुख्याध्यापक श्री गुंजाळ बी.बी. यांनी केले. संमेलनातून भाषेचा जागर आणि विचारांची देवाणघेवाण, विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेला संधी उपलब्ध करून देणे हेच विद्यालयाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन केले.

संमेलनाचे अध्यक्ष समाधान प्रताप आव्हाड यांना मानाचा फेटा, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन अभिमानाने सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचेही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहनशेठ काकड यांनी सहभागी बाल साहित्यिकांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
लेखक डॉ. संतोष साबळे यांनी महाराष्ट्रात एकमेव अशी शाळा असेल जिथे अशा पद्धतीचे संमेलन भरवले जाते. या संमेलनाचा अध्यक्ष एक विद्यार्थी असतो. जो अध्यक्ष 200 पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन करतो, वाचलेल्या सर्व पुस्तकांचे अभिप्राय लेखन करतो, असा गुणी आणि अभ्यासू विद्यार्थी या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होतो. तेव्हा फार समाधान वाटते. जीवनात यश कसं संपादित करावं यासह मराठी भाषेचा गौरव करतानाच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि त्यांचे लेखन कौशल्ये विकसित व्हावे यासाठी गेल्या १३ वर्षांपासून होत असलेला साहित्याचा जागर राज्यातील शाळांसाठी आदर्श ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. दापूर सारख्या ग्रामीण भागातील मुलांना दररोज काहीतरी वाचण्याचं, लिहिण्याचं आवाहन डॉ. साबळे यांनी केले. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रेरक स्व -अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
विद्यालयातील स्वरा आव्हाड हिने मराठी भाषा गौरव दिनावर अतिशय सुंदर आणि प्रभावी भाषण सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी ‘मी मराठी ‘ या गाण्यावर नृत्य सादर केले. विद्यार्थी यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. त्यात महिलांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांचे दुःख, निसर्ग, प्राणी, आई बाप, शाळा अशा विविध विषय आणि आशय संपन्न स्वरचित कवितांचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांना मिळाला.बालकवी स्वरा आव्हाड,अनन्या आव्हाड, साक्षी गुरकुल, निखील साबळे, अद्विक आव्हाड, ज्ञानेश्वर आव्हाड, यश आव्हाड, ज्ञानेश्वरी पांडुरंग आव्हाड यांच्या कवितांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांना भुरळ घातली.
समारोपप्रसंगी तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समाधान प्रताप आव्हाड यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. त्यात वर्षभर आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. जीवनात अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करून एक दिवस स्वतःच वेगळं साहित्य निर्माण करण्याचा मानस समाधान यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंजाळ सर यांचे आभार मानले.
आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अमोल काशीद यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप करण्यात आला.