फ्रवशी रोटरी इंटरॅक्ट क्लबचा पक्ष्यांसाठी अनोखा उपक्रम

नाशिक: उन्हाळ्याच्या कडक उन्हात तहानलेल्या पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे करत, फ्रवशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी नुकताच संवेदनशील आणि प्रेरणादायक अनोखा उपक्रम राबवला. सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मातीचे पाण्याचे भांडे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना भेट दिली. तसेच आपल्या गॅलरीत आणि गच्चीवर ठेवून पक्ष्यांसाठी दररोज पाणी भरून ठेवण्याचे आवाहन केले.
या उपक्रमासाठी निधी गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील अनाथाश्रमातील मुलांनी बनवलेली हस्तनिर्मित साबणे विकत घेतली. व ती शाळेत विकून मिळवलेले उत्पन्न यासाठी वापरले. या माध्यमातून त्यांनी पक्ष्यांसोबतच गरजू मुलांचाही हात धरला. रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत, इंटरॅक्ट शिक्षक सल्लागार रीना मल्होत्रा ह्यांच्या मार्गदर्शनाने

विद्यार्थी प्रतिनिधी स्निधा अरोरा, सिया तर्डे, कबीर कपूर, अंश कुरूप यांनी उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
हा दुहेरी हेतू—पक्ष्यांचे संरक्षण आणि गरजू मुलांचे सशक्तीकरण—इंटरॅक्ट क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा आणि पर्यावरण संवर्धनाच्या जाणिवेचा उत्कृष्ट नमुना आहे. शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उन्हाळ्यात मातीची पाण्याची भांडी भरून ठेवण्याचे आश्वासन दिले.
अशा लहान पण परिणामकारक उपक्रमांमधून फ्रवशी इंटरॅक्ट क्लब विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, शाश्वतता आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.