इतर

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावित व स्वप्नाचा पाठलाग करतांना मोबाईल पासुन दुर रहावे-आमदार डॉ लहामटे

दहावी -बारावीच्या निकालात आश्रम शाळेतील मुलींचा डंका…!


अकोले प्रतिनिधी

– विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावित परंतु स्वप्नाचा पाठलाग करतांना मोबाईल पासुन दुर रहावे तसेच आश्रम शाळा शिक्षकांनी देखील गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा बाबत सतत जागृत रहावे असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डाॅ.श्री.किरण लहामटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले तर आश्रम शाळा दर्जा सुधारत असलेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या 38 शासकीय व निमशासकीय आश्रमशाळेपैकी शंभर टक्के निकाल लागलेल्या सात तर बारावी कला विज्ञान सहा आश्रमशाळेतील प्रथम पाच आलेल्या मुला मुलींचा व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा दि.5/06/2025 रोजी प्रकल्प कार्यालय राजुर येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.किरण लहामटे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम.देवकण्या बोकडे या होत्या.
शासकीयआश्रमशाळेतील इ.10 ला 279 मुले व 347 मुली असे एकुण 628 विद्यार्थी बसले होते. पैकी उत्तिर्ण 264 मुले तर 337 मुली असे एकूण 599 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांचा 93.55 टक्के तर मुलींचा 97.12 टक्के निकाल लागला असुन राजुर प्रकल्पाचा शेकडा निकाल 95.53 इतका लागला आहे.मुलात प्रविण दिनकर भांगरे 89.40 (रतनवाडी)तर मुलीत विद्या सुभाष वाघ 89.60 (आदर्श मवेशी) हे विद्यार्थी प्रथम आले आहेत.
तर बारावी कला शाखेत 194 मुले तर 180 मुली उत्तीर्ण झाले असून 92.78 शेकडा निकाल लागला असून बारावी विज्ञान शाखेत 199 विद्यार्थी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के निकाल आहे. तसेच राजुर प्रकल्पाचा बारावी कला व विज्ञान शाखेचा एकुण शेकडा निकाल 96.44 इतका लागला आहे.बारावी कला शाखेत मुलात कचरे विजय कृष्णा 74.67 (केळीकोतुळ)तर मुलीत लहामटे दिक्षा सुभाष 81.17 (केळीकोतुळ) तर विज्ञान शाखेत मुलात वायळ संकेत जनार्दन 68.17(केळीकोतुळ) तर मुलीत वायळ गौरी संतोष72.67 (केळीकोतुळ) या मुलांनी बाजी मारली आहे.


इयता दहावी व बारावी(कला,विज्ञान शाखांत) प्रथम तिन आलेल्या मुला-मुलींना अनुक्रमे-5000/-,3500/-,2500/- रोख बक्षीस, प्रमाणपत्र व ट्राॅफी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रकल्प अधिकारी श्रीम. देवकन्या बोकडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, गुणवत्ता वाढीसाठी प्रकल्प कार्यालय सतत प्रयत्नशील असुन शाळा स्तरावर इ. 10 वी 12 वी.विकेंड टेस्ट, सुपर फिप्टी,
,मिशन आरंभ,स्कॉलरशिप सराव परीक्षा,जादा तास यासारखे शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत तर शिक्षकांसाठी सुध्दा गुरूशाला प्रकल्प, विविध शैक्षणिक प्रशिक्षणे आयोजित करून शैक्षणिक दर्जा वाढ व आश्रमशाळा विद्यार्थी वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्रीम बोकडे यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले.
कार्यक्रमासाठी श्री.मनोजकुमार पैठणकर (प्रशासन),तुषार पवार (नियोजन)दिपक कालेकर (शिक्षण)हे सहा.प्रकल्प अधिकारी तर सुनील मोरे,शाम कांबळे हे कार्यालयीन अधिक्षक तसेच संजय सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते तर प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वृंद ऊपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिपक कालेकर सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण)यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.अंबादास बागुल (शिक्षणविस्तार अधिकारी) यांनी केले.
कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी पालक,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button