वासुंदे येथे मोफत फळबाग लागवड कार्यक्रम व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
साय ट्रीज एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट आणि देवकृपा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वासुंदे (ता. पारनेर) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, वाबळे वस्ती येथे मोफत फळबाग लागवड कार्यक्रमांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमात आंबा, चिक्कू, चिंच, जांभूळ, मोसंबी, संत्री, फणस, आवळा यांसह बांधावर लागवड करण्यासाठी रक्तचंदन, मोहगनी, सागवान आणि मोह या वृक्षांचे मोफत वाटप केले जाणार आहे.प्रशिक्षण शिबिरात फळबाग लागवडीचे नियोजन, देखभाल आणि वृक्षसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाला मा. सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, अहमदनगर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि इच्छुकांनी या शिबिरात सहभागी होऊन मोफत रोपांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी साय ट्रीज एन्व्हायर्नमेंटल ट्रस्टशी संपर्क साधावा.