यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाचे ५ लाख सदस्य
सर्वाधिक नोंदणी असलेले देशातील पहिले राज्य विद्यापीठ
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाने पाच लाख माजी विद्यार्थी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला आहे. संघ स्थापना झाल्यापासुन गेल्या पावणेपाच वर्षाच्या कालखंडातच या माजी विद्यार्थी संघाकडे आजतागायत तब्बल ५ लाख ६ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी सदस्यता नोंद केलेली आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्व विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक माजी विद्यार्थी सदस्य नोंदणी असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देशातील पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे. यामुळे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेवून वाटचाल करणाऱ्या विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सन १९८९ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आजतागायत सुमारे ५५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध शिक्षणक्रमांच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. सन २०२० मध्ये विद्यापीठात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. त्यात सामील होण्यासाठी विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना https://www.ycmoualumni.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले. त्यात त्यांनी कोणत्या विद्याशाखेतून कोणता शिक्षणक्रम कधी पूर्ण केला, सध्या ते कोणत्या आस्थापनेत कोणत्या पदावर काम करत आहेत, याबाबतची माहिती देत सदस्य होण्याचे आवाहन केले होते.
माजी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस डॉ. संतोष साबळे यांच्याकडे या विभागाची धुरा देण्यात आली होती. डॉ. साबळे यांनी माजी विद्यार्थी संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी करून घेतली. १० सप्टेंबर २०२० रोजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघास नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. यानंतर माजी विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना सदस्य होण्यासाठी आवाहन केले गेले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत माजी विद्यार्थ्यांचे संघठन वाढविण्यावर भर देण्यात आला. तसेच त्यांच्या निरनिराळ्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी असे विविध शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सुमारे ५ लाख ६ हजार ८५७ एवढी झाली आहे. विद्यार्थ्यांचा डेटा संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
आजवर माजी विद्यार्थी संघाला बळ देण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ. माणिकराव साळुंके, प्रा. ई. वायुनंदन तसेच कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. प्रकाश देशमुख, भटूप्रसाद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आणखी मोठ्या प्रमाणात विद्यापीठाशी जोडण्यासाठी जगभरातील माजी विद्यार्थांचा लवकरच मेळावा आयोजित करण्याचा मनोदय असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविण्यासाठी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्यासह संस्थेचे सदस्य तथा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ. संजीवनी महाले, उपाध्यक्ष डॉ. गोविंद कतलाकुटे, खजिनदार कविता देव, डॉ. नितीन ठोके, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, धावपटू कविता राऊत, राहुल खैरनार यांचेही उत्तम सहकार्य लाभले. दरम्यान, मुक्त विद्यापीठातून कोणताही शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी https://www.ycmoualumni.org संकेतस्थळास भेट देवून आपली नोंदणी करावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राज्यभर उपक्रम राबविणार
विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. माजी विद्यार्थ्यांची नाळ विद्यापीठाशी जोडली जावी, त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, नवीन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. आज या माजी विद्यार्थी संस्थेचे ५ लाख ६ हजार ८५७ एवढे सदस्य आहेत. याचा मनस्वी आनंद वाटतो. आगामी काळात विद्यापीठातर्फे माजी विद्यार्थ्यांसाठी अनेक भरीव उपक्रम राज्याच्या विविध भागात राबविण्यात येतील.
प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
विद्यार्थ्यांच्या यशोगाथा प्रेरणादायी
विद्यापीठात रुजू झाल्यापासून विद्यापीठाच्या विवध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत गेलो. विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तिकेची निर्मिती केली. नंतर माजी विद्यार्थी संस्थेची जबाबदारी विद्यापीठाने सोपवली होती. गेल्या पावणेपाच वर्षात पाच लाख माजी विद्यार्थ्यांची सदस्यता नोंदणी करता आली, याचा मोठा आनंद आहे.

डॉ. संतोष साबळे,
सरचिटणीस
माजी विद्यार्थी संघ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ