इतर

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण नियोजन-मुख्यमंत्री

पुणे :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमवेत हिंजवडी आय. टी. पार्क, पुणे येथील समस्यांबाबत बैठक संपन्न झाली.

पुण्यातील हिंजवडी आय. टी. पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा विविध समस्या आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसी यांनी योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनांचा वापर करून नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहद् आराखडा सादर करावा.

हिंजवडी आय. टी. पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आय. टी. अभियंते आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात या कोंडीत आणखी भर पडते. या भागात रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा आणि मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. कस्पटे वस्ती ते हिंजवडी फेज 3 पर्यंतचा रस्ता स्वतंत्र केल्यास वाहतुकीची गर्दी कमी होईल. सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सिटीचा प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहापदरी करून त्याबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा.

सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंगे ते हिंजवडी फेज 1, शनि मंदिर वाकड ते मरूंजी, नांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामांना संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडोरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे. गर्दी वाढल्याने नागरिक रस्त्यावर येणार नाहीत यासाठी फूटपाथचा विषय दोन्ही महानगर पालिकांनी हाती घेऊन मार्गी लावावा. पाटील वस्ती ते बालेवाडी रोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुढील वर्षापर्यंत अभ्यास करून योग्य प्रवाह होईल असे नियोजन करावे. आवश्यक त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावीत. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्तांनी समन्वय साधून बैठका घ्याव्यात अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष पीएमआरडीएचे आयुक्त यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. शंकर जगताप, आ. महेश लांडगे, आ. शंकर मांडेकर, संबंधित अधिकारी तसेच हिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button