बालगंधर्व रंगमंदिरात रुग्ण हक्क परिषदेच्या ‘कलाकार आघाडी’ शाखेचे उदघाट्न

*
पुणे, दि. १५ जुलै २०२५: कलाकारांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आणि त्यांना वैद्यकीय आधार देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेने पुढाकार घेतला आहे. आज पुण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर येथे रुग्ण हक्क परिषदेच्या ‘कलाकार आघाडी’ शाखेचे थाटात उद्घाटन झाले. या शाखेच्या स्थापनेमुळे सततच्या दौऱ्यांमुळे आणि जागरणामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्या कलाकारांना वैद्यकीय आर्थिक मदत मिळणे सोपे होणार आहे. “ही शाखा कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरेल,” असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर शाखेच्या नामफलकाचे अनावरण मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अपर्णाताई साठ्ये मारणे, कलाकार आघाडीचे समन्वयक अमर पुणेकर, गायक विशाल चव्हाण, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अनिल गुंजाळ, गायक राहूल शिंदे, चित्रसेन भवार, अरुण गायकवाड, विनोद धोकटे, शंकर घोडेराव, रणजित सोनावळे, रशिद पुणेकर, विनायक कडवळे, हरिष गुळीग, नृत्यांगना मृणाल लोणकर, हेमा कोरबरी, वर्षा जगताप, स्वप्ना पाटील, स्वाती धोकटे, शितल बालवडकर, वसंत जाधव, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, अंतून घोडके, गायक उमेश गवळी, संदीप रोकडे, सचिन अवघडे, दिग्दर्शक योगेश जोशी, निर्माते वसंतराव बंदावणे, अजय विरकर, संतोष गायकवाड, रंजना जगताप, रेश्मा जांभळे, विमल सोंडे, प्रभा अवलेलू, अभिनेते प्रशांत बोगम यांच्यासह अनेक कलाकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “कलाकार हे समाजाचे प्रमुख घटक आहेत. त्यांना मोफत उपचार आणि आर्थिक आधार देणे, हा आमचा हक्क आणि कर्तव्य आहे. ही शाखा कलाकारांच्या कल्याणासाठी अथक कार्य करेल.”

विशाल चव्हाण यांनी प्रास्ताविकात शाखेचे महत्त्व विशद केले, चित्रसेन भवार यांनी सूत्रसंचालनाने उपस्थितांना खिळवून ठेवले, तर अमर पुणेकर यांनी आभारप्रदर्शन केले. या उपक्रमामुळे पुण्यातील कलाकार समुदायाला एक भक्कम आधार मिळाला आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक होईल.