अकोल्यात जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात साजरा

अकोले प्रतिनिधी
: सहानुभूती नव्हे, विश्वास द्या प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ द्या” या संकल्पनेचा आधार घेऊन समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत समता सप्ताह निमित्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी, धुमाळवाडी, अकोले खुर्द, फिजिओथेरपी सेंटर अकोले येथे जागतिक दिव्यांग दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी केंद्रशाळा टाकळी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.संजय देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विठे केंद्राचे विशेष शिक्षक श्री. संदिप कडवे व अकोले तालुका संसाधन कक्ष काळजी वाहक सौ. मनिषा झोळेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात टाकळी केंद्रशाळेचे विशेष शिक्षक श्री. कैलास झोळेकर यांनी जागतिक दिव्यांग दिवसाचे महत्त्व तसेच दिव्यांग बालकांचे अधिकार याविषयी प्रबोधन केले. श्री. संदिप कडवे यांनी थोर अमेरिकन दिव्यांग लेखिका हेलन केलर यांच्या जीवनपटाची माहिती दिली. टाकळी केंद्र मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या संघर्षमय जीवनचरित्राची ओळख करून दिली. सहशिक्षक देवगिरे यांनी टाकळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु. गौरी दातखिळे विषयी अनुभव कथन केले.
अध्यक्षीय भाषणात संजय देशमुख यांनी कोकणकडा सर करुन विश्वविक्रमाला गवसणी घालणारा दिव्यांग साहसवीर केशव भांगरे याचा प्रेरणादायी वृतांत कथन केला. यावेळी दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सहशिक्षिका श्रीमती संगिता धिंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




