सिंहगड कॉलेज, लोणावळा येथे न्याय मागण्यांसाठी सर्व कामगार दि 19 जानेवारी पासून बेमुदत संपावर
.
१४ महिने पगार थकीत, २०२५ पर्यंत पीएफ बाकी, अनंत बँकेच्या ठेवी अद्याप परत नाहीत
लोणावळा : सिंहगड कॉलेज, लोणावळा येथील कर्मचारी व कामगार गेल्या दीर्घ काळापासून अत्यंत गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात असून, त्यांच्या न्याय्य व कायदेशीर मागण्यांकडे व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी, न्याय मिळविण्यासाठी संघर्षाचा मार्ग अवलंबण्याशिवाय कामगारांसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही, असा इशारा भारतीय मजदूर संघ चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी दिला आहे.
कॉलेजमधील अनेक कर्मचारी व कामगारांचे सलग १४ महिन्यांचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, शिक्षण, आरोग्य व दैनंदिन खर्च भागविणे अशक्य झाले आहे. त्याचप्रमाणे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) रक्कम सन २०२५ पर्यंत थकीत असून, ही गंभीर कायदेशीर बाब असतानाही व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. या बाबतीत सह्यायक कामगार आयुक्त श्री गजानन शिंदे यांनी त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती पण व्यवस्थापनाकडून कोणीही उपस्थित नव्हते . त्याच प्रमाणे लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात मिटींग संपन्न झाली या वेळेस व्यवस्थापनाकडून संचालक गायकवाड उपस्थित होते. बैठकीदरम्यान सिंहगड टेक्निकल चे चेअरमन एम एन नवले यांच्यासोबत मिटींग आयोजित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले .
याशिवाय, कामगार व कर्मचाऱ्यांच्या अनंत बँकेत असलेल्या ठेवी आजतागायत परत मिळालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासन व व्यवस्थापनाकडून फक्त आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणताही दिलासा मिळालेला नाही.
कामगार संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, जर तात्काळ थकीत १४ महिन्यांचे संपूर्ण वेतन अदा केले नाही, पीएफची थकीत रक्कम त्वरित जमा करण्यात आली नाही, अनंत बँकेतील कामगारांच्या ठेवी परत मिळवून दिल्या नाहीत, तर येत्या काळात तीव्र आंदोलन, धरणे, निदर्शने व कायदेशीर लढा उभारण्यात येईल. या संघर्षाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कॉलेज व्यवस्थापन व प्रशासनाची राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा संघर्ष शेवटपर्यंत चालू राहील, असे संघटनेने चिटणीस बाळासाहेब भुजबळ व कामगार प्रतिनिधि सुजीत मिसाळ,दत्ता गाडे , शुभम फाळके , अतुल बोरकर, नितीन गुंड, सुरेखा कदम यांनी ठामपणे जाहीर केले आहे.


