आंतरराष्ट्रीय कामगार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतीय मजदूर संघाचे दोन प्रतिनिधीची निवड

मुंबई दि. ११ ऑक्टोबर २०२६ :
भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव ॲड. अनिल धुमणे आणि सह-उद्योग प्रभारी श्रीमती शर्मिला पाटील यांची आंतरराष्ट्रीय कामगार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली असून, ते आज बँकॉक, थायलंड येथे रवाना झाले आहेत. दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात ते भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ILO-ITC आणि JILAF यांच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे विषय “Employment and Industrial Relations for Distant Work” (दूरस्थ कामाच्या संदर्भातील रोजगार व औद्योगिक संबंध) आणि “Renewing Trade Union Strategy through HRDD, Social Dialogue and Living Wage” (मानवी हक्कविषयक योग्य दक्षता, सामाजिक संवाद आणि जीवननिर्वाहयोग्य वेतन यांच्या माध्यमातून कामगार संघटनांच्या रणनीतीचे नूतनीकरण) असे आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दि. २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी झालेल्या निवडक प्रतिनिधींना बँकॉक येथे होणाऱ्या प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये भारतीय मजदूर संघाच्या दोन प्रतिनिधींची निवड होणे ही संघटनेसाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.
ॲड. अनिल धुमणे हे भारतीय मजदूर संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून, अखिल भारतीय सचिव म्हणून राष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या प्रश्नांवर कार्यरत आहेत. विविध उद्योगांतील वेतनवाढ करार, कामगार आंदोलने, कामगारविषयक कायदेशीर बाबी तसेच लेबर कोडसंदर्भातील धोरणात्मक अभ्यास यांचा त्यांना व्यापक अनुभव आहे. कामगारांचे हक्क व हितसंबंध यांच्या संरक्षणासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
श्रीमती शर्मिला पाटील या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात कार्यरत होत्या. त्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. कामगार महासंघाच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी विविध कामगार आंदोलने, वेतनवाढीच्या वाटाघाटी, महिला कामगारांचे प्रश्न तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना कामगार संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
सध्याच्या बदलत्या रोजगार व्यवस्थेत दूरस्थ काम, कामगारांचे अधिकार, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक संवाद आणि जीवननिर्वाहासाठी पुरेसे वेतन हे विषय अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध देशांतील कामगार संघटनांच्या कार्यपद्धती, अनुभव आणि रणनीती यांची माहिती मिळणार आहे. या प्रशिक्षणातून प्राप्त होणारे ज्ञान आणि अनुभव भारतातील कामगार चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच कामगारांचे हक्क, न्याय्य वेतन आणि औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय मजदूर संघाच्या दोन प्रतिनिधींची या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी झालेली निवड ही संघटनेच्या कार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब असून, त्यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय कामगार चळवळीला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नवी दिशा मिळण्यास मदत होईल . या संदर्भात माहीती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.



