राजूर येथील देशमुख महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी!

राजुर/ प्रतिनिधि
अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली
. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रा. डॉ. मोहन शिंदे यांचे प्रमुख व्याख्यान झाले. डॉ. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांच्या उदय काळातील सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी विशद करून फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, महात्मा फुले यांना ज्या पुरोहित वर्गाने छळले व ज्यांनी फुले यांच्या कार्यात अडथळे आणले त्याच पुरोहित वर्गासहित सर्व समाजघटकांसाठी फुलेंनी शाळा काढून सर्वांना शिक्षण दिले. फुलेंच्या काळात स्रिया आणि बहुजनांना शिक्षण बंदी असताना फुलेंनी स्त्रिया व बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. हंटर आयोगासमोर साक्ष देऊन व ब्रिटिशांशी भांडून बहुजनांचे शिक्षण सुरू केले. विधवांच्या केशवपन प्रथेविरुद्ध जनजागृती केली व पुण्यात या प्रथेविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. बालविवाहामुळे विधवा झालेल्या बलात्कारित विधवांच्या बाळंतपणासाठी प्रसूतिगृहे सुरू केली. देशात पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. प्रस्थापितांनी दडपलेला शिवरायांचा इतिहास महात्मा फुले यांनी पुढे आणला. शिवरायांवर पहिला पोवाडा ही महात्मा फुलेंनीच लिहिला. फुलेंनी प्रस्थापित वैदिक धर्मकल्पना नाकारून सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. महात्मा फुलेंचे चरित्र विविधांगी होते. ते खूप विद्वान असूनही त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत साहित्य निर्मिती केली. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या चरित्रातून शिकवण घेऊन त्याप्रमाणे वर्तन करण्याचे व फुले यांचे विचार पुढे नेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाला महात्मा फुले यांचे अभ्यासक प्रा. डॉ. दत्तात्रय गंधारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर प्रभारी प्राचार्य भाऊसाहेब देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष अस्वले यांनी केले. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संचालक प्रा. नितीन लहामगे, प्रा. तानाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.