गुरुमुळे मानवी जीवन संमृद्ध.– आदिनाथ सुतार

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले येथील शैक्षणिक संकुलातील आदर्श आश्रम शाळा भंडारदरा कॅम्प मवेशी येथे बुधवारी शाळेतील जेष्ठ शिक्षक मारुती लहामटे सर यांचे अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सरस्वती पूजनानंतर पूजा दोडके या विद्यार्थीनिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले .कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात आपल्या प्रमुख भाषणात आदिनाथ सुतार म्हणाले की,आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग,सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥
एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतात.
या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो. वेगवेगळा पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात..परंतु खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे .गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. या जगाच्या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.
गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे. गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे असेही विचार श्री.सुतार यांनी आपल्या प्रमुख भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत. मांडले.तसेच श्री. सोनवणे ,गायकर व लांडगे सर व कुलप्रमुख श्री.भाऊसाहेब खरसे सर इत्यादींनी. विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त उदबोधित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.जगन्नाथ जाधव सर यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.