बनकर कुटुंबाकडून माळीझाप जि प शाळेस सीसीटीव्ही संच भेट!

अकोले- शहरातील माळीझाप गावातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब बनकर सर हे विविध माध्यमिक विद्यालययात सेवानिवृत्त झालेले एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी राहिलेले आहे. त्यांच्या पत्नी देखील शिक्षिका आहे. शैक्षणिक दातृत्वासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच पुढाकार घेत असते . श्री.बाळासाहेब बनकर सर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षण तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये शाळेतील मुलामुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्हीची गरज असल्याचा विषय चर्चेला आला असता श्री.बाळासाहेब बनकर सरांनी तात्काळ स्वखर्चाने शाळेस सीसीटिव्ही संच देण्याची तयारी दर्शवली. त्यांचा मुलगा योगेंद्रचे वसंत मार्केट,अकोले मध्ये अगस्ति टेक्नॉलॉजी हे सीसीटिव्ही, संगणक, लॅपटॉप विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. अकोले तालुक्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये योगेंद्र बनकर यांनी रास्त किमतीत सीसीटिव्ही कॅमेरे बसवून मुला मुलींच्या सुरक्षेला हातभार लावलेला आहे. नुसते बोलून न थांबता त्यांनी लगेच मुलगा योगेंद्र यांस बोलावून घेऊन शाळा इमारत व परिसरात आवश्यक ठिकाणांची पाहणी करून एकवीस हजार रुपये किमतीचा सीसीटिव्ही संच बसवून देण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्याच दिवशी योगेंद्र बनकर यांनी शाळा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवून दिले. आपल्या वर्गातील व शालेय परिसरातील दृष्ये स्क्रीनवर एकत्रितपणे पाहून सर्व विद्यार्थी भारावून गेले. पालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
बनकर कुटुंबाने केलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना अभंग , सहशिक्षक श्री. संजय गोडे , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अर्चना मंडलिक, सर्व सदस्य व पालकांनी आभार मानले.
शाळेसाठी मिशन आपुलकी उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची मदत मिळाल्याबद्दल अकोले केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय भांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. माधव हासे व गटशिक्षणाधिकारी श्री. अभयकुमार वाव्हळ साहेब यांनी दानशूर कुटुंबाचे व जि.प. माळीझाप शाळेचे अभिनंदन केले आहे.