कोरोनाने विधवा झालेल्या महिलांना सन्मानाने रोजगार उपलब्ध झाला पाहिजे – डॉ.निलम गो-हे

कोरोनाने पती गमविलेल्या महिलांशी साधला संवाद
संगमनेर प्रतिनिधी
कोरोनाने पती मृत्यू झालेल्या एकल महिलांचे पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना सन्मानाने जगता यावं. यासाठी रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी आज येथे व्यक्त केले.
संगमनेर येथील शासकीय वसतिगृहात कोरोनाने मृत्यू झालेल्या एकल महिलांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोरोना एकल समितीचे हेरंब कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे व तालुका संरक्षण अधिकारी उपस्थित होते.
उपसभापती निलम गो-हे म्हणाल्या, ज्यांचे पती शेतकरी होते. पण कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा महिलांना कृषी विभागाने शेतीसाठी खते व बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत.

महिलांच्या नावावर मालमत्ता व शेती हस्तांतरित लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. यासाठी महसूल प्रशासनाने अशा महिलांना न्यायिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.असे निर्देश ही श्रीमती गो-हे यांनी यावेळी दिले.
श्रीमती गो-हे म्हणाल्या, एकल महिलांनी फक्त उद्योगासाठी कर्ज मिळविणे या एकच उद्देश न ठेवता शिक्षणानुसार नोकरी प्राप्त करण्यावर भर द्यावा. जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ व किमान कौशल्य विभागाच्या योजनांच्या माध्यमातून या महिलांना लाभ देणे शक्य आहे. असेही श्रीमती गो-हे यांनी यावेळी नमूद केले.