माध्यमांनी यंत्रणेला जाब विचारण्याची भूमिका घ्यायला हवी – ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे

नाशिक रोटरी क्लबतर्फे पत्रकारांचा सन्मान
नाशिक :दि 22 देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी छापील माध्यमांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आज काळानुरुप बदल झाले असले तरी उपलब्ध भरमसाट माहितीचे रुपांतर ज्ञानात करतांना वाचकांपुढे अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या राजकीय बदलांचा विचार करता माध्यमांनी यंत्रणेला जाब विचारण्याची भूमिका घ्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचा काल (२१ जानेवारी बाळशास्री जांभेकर पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार प्रदान ज्येष्ठ पत्रकार तथा नामवंत साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी रोटरीचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत, जनसंपर्क संचालक निलेश सोनजे आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संतोष साबळे उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे पुढे म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी उर्वरित तीन स्तंभांकडून माध्यम क्षेत्रावर दबाव टाकला जातो आहे. अशावेळी जनमानसांनी माध्यम क्षेत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणे गरजेचे आहे. रोटरी क्लबसारख्या संस्थेची स्थापना विश्व युद्धांपूर्वी झालेली आहे. जेव्हा विश्वयुद्धाची परिस्थिती निर्माण झालेली असताना, जगाला सेवाभावनेची गरज आहे, ही बाब ओळखून संस्था स्थापन झाली. त्यामुळे ह्या संस्थांचे काम केवळ वाढदिवसांचे सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यापुरता मर्यादित नसून समाजघटकांसाठी योगदान देण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना मिलिंद कुलकर्णी यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडून सांगितला. तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल रोटरी संस्थेचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले.
रोटरी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना वेळोवेळी माध्यमांमध्ये स्थान देणाऱ्या विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संतोष साबळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील मान्यवर तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड विद्युलता तातेड यांनी केले. सीए रेखा पटवर्धन यांनी आभार मानले. निलेश सोनजे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समिती प्रमुख दमयंती बरडीया, वैशाली रावत, लीना बकरे,सुधीर वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
………………………………….