अकोल्यात रोटरी क्लबचे पुरस्काराचे वितरण!
अकोले (प्रतिनिधी)-शिक्षक हे राष्ट्र घडविणारे असून समाजात त्यांनी नेहमी ताठ मानेने वागले पाहिजे असे आवाहन पुणे येथील ज्येष्ठ संशोधक प्रोफेसर डॉ.प्रविण सप्तर्षी यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अकोले महाविद्यालयाच्या कै.के. बी .दादा देशमुख सभागृहात आयोजित “राष्ट्रबांधणीचे शिल्पकार”पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रो.डॉ.सप्तश्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब चे अध्यक्ष सचिन आवारी होते.
याप्रसंगी डॉ.सप्तश्री व आमदार डॉ.सुधिर तांबे यांच्या शुभहस्ते अकोले तालुक्यातील 18 प्राथमिक, 3 माध्यमिक,ज्युनि.कॉलेजचे प्राचार्य अशा 21 उपक्रमशील शिक्षकांना ‘ राष्ट्रबांधणी शिल्पकार ‘या पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
यावेळी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे.डी. आंबरे पाटील,अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले ,अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, पं. स. चे शिक्षण विस्तार अधिकारी राजेश पावसे, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रिकट 3132 चे पब्लिक इमेजचे सल्लागार अमोल वैद्य,रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो.संदीप दातखिळे खजिनदार रो.गंगाराम करवर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
डॉ.सप्तश्री पुढे म्हणाले की- शिक्षकाचा सन्मान म्हणजे संपूर्ण समाजाचा सन्मान मी मानतो. शिक्षकांमध्ये समाज परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असते .त्यामुळे शिक्षकाने कुठल्याही राजकीय किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पुढे मान न झुकवता स्वाभीमानाने सामोरे गेले पाहिजे. असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब तर्फे शिक्षकांचा सन्मान होतोय हीच मुळात माझ्यासारख्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. परिवर्तनाची सुरूवात शिक्षकां पासून होते त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याने मी प्रभावित झालेलो आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्या लोकांना मी नतीभ्रष्ट म्हणतो. आणि ज्यांची नती भ्रष्ट झालेली आहे अशी माणसे कुठल्याही थराला जाऊ शकतात हे आपण बघतो आहे. त्यामुळे संविधान हेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक आहे त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे यावर मी विश्वास ठेवतो.भारतीय राज्यघटना पाळत नसणाऱ्यांना नतद्रष्ट म्हंटले आहे. हिंदू-मुस्लिम भाई भाई ही चळवळ रुजविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
आ.डॉ.तांबे म्हणाले-
समाजात सर्वात महत्त्वाची गरज आहे ती दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची. शिक्षणाने समृद्ध पिढी निर्माण होऊ शकते यावर माझा विश्वास आहे. माझ्या कुटुंबाने मला स्थिरस्थावर होण्यासाठी व भविष्यात आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्यासाठी डॉक्टर केले हे सत्य आहे. शिक्षणावर व शिक्षण व्यवस्था उभी करण्यावर शासनाने अधिक भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त खर्च हा शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसे घडत नाही ही आजची खंत आहे. शिक्षणासोबतच आरोग्य उत्तम राहण्यासाठी उच्च दर्जाचे दवाखाने आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे हे देशाच्या हिताचे आहे. दुर्दैवाने आजही आपल्या देशामध्ये आरोग्याच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आणि लोकसंख्येच्या मानाने तुटपुंज्या आहेत. यावर अधिक भर देण्याची व देशाच्या एकूण जीडीपी च्या किमान तीन ते सहा टक्के खर्च शिक्षण आणि आरोग्यावर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या आर्थिक उन्नतीचा शिक्षण हाच मार्ग आहे. शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत.जि प च्या अनेक शाळांत स्वच्छतागृहे नाहीत.शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा आहेत.राज्यकर्ते शिक्षणाकडे गांभीर्य पूर्वक पाहत नाहीत.असे सांगत रोटरी क्लबच्या विधायक व सामाजिक कार्याचा आपल्याला आदर असल्याची भावना डॉ.तांबे यांनी बोलून दाखविली.
यावेळी जे डी आंबरे,मधुकरराव नवले यांनीही मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक रोटरी क्लबचे लिटरसी डायरेक्टर ऍड. बी जी वैद्य यांनी केले,स्वागत रोटरी चे अध्यक्ष सचिन आवारी यांनी केले.सूत्रसंचालन हभप रो.दीपक महाराज देशमुख व विमान प्रवासाची गोष्ट या पुस्तकाचे लेखक भाऊसाहेब कासार यांनी केले. तर आभार सचिव प्रा.डॉ.सुरींदर वावळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे ऍड बी जी वैद्य, अध्यक्ष सचिन आवारी,उपाध्यक्ष संदीप दातखिळे, सचिव प्रा.डॉ सुरींदर वावळे, खजिनदार गंगाराम करवर,माजी अध्यक्ष सचिन देशमुख,सचिन शेटे,सुनील नवले,निलेश देशमुख,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,डॉ.रविंद्र डावरे, आदींसह सर्व रोटरीयन्स यांनी परिश्रम घेतले.
चौकट-यावेळी पुरस्कार्थीना देण्यात आलेली ट्रॉफी ही रोटरी क्लबचे इन्व्हायरमेंट डायरेक्टर, संदेश चष्माघर चे संचालक रो. अमोल देशमुख यांनी प्रायोजित केली होती.त्यांच्या कल्पनेप्रमाणे तयार केलेल्या या आकर्षक ट्रॉफीचे अनेकांनी कौतुक केले
यावर्षी रोटरी क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले शिक्षक,प्राचार्य व प्राथमिक शाळा, माध्य.विद्यालय व ज्युनि कॉलेज पुढीलप्रमाणे-
*प्राथमिक विभाग-
राजेंद्र भाग्यवंत ( जि.प. प्राथ शाळा,गर्दनी), तुषार सुधीर फल्ले ( गोसावीदरा,देवठाण), बाळासाहेब तोरमल( धामणगाव आवारी), दीपक सुकटे (केळी-रुम्हणवाडी), राजेंद्र भांगरे(कोकणवाडी),विश्वनाथ गंभीरे,(पांगरी),रामदास लांघी (धामणवण),विजय कातडे(रणद खुर्द),भरत उघडे(आनंदवाडी,चास), दुंदा ढगे(विठे), उषा शिवराम शेंगाळ ( बारी बंगला), योजना पांडुरंग गोडसे ( वाशेरे),काळू तपासे (निळवंडे),बाळासाहेब आवारी(नवलेवाडी),सौम्या दिलशाद शेख, व प्रा.हेमंत मंडलिक(अभिनव अकोले), संतोष थोरात( ऍग्री टेक्निकल स्कुल,कोतुळ)प्रशांत शिवाजी हासे( मवेशी आश्रमशाळा ,
*माध्यमिक विभाग- संतोष रामा कचरे( प्राचार्य,मॉडर्न हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, अकोले), दिलीप नामदेव काळे ( आम्लेश्वर विद्यालय आंभोळ ),सुरेश विठोबा आंबरे( प्राचार्य ,सह्याद्री विद्यालय व ज्युनि.कॉलेज, ब्राम्हणवाडा)