जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगट लसीकरण मोहीम सुरू!

८ जानेवारी पर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट
शिर्डी, प्रतिनिधी
– कोरोना प्रतिबंधासाठी १५ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांना ३ जानेवारी २०२२ पासून कोवीड लसीकरण सुरू झाले आहे.
या वयोगटांसाठी ‘कोव्हॅक्सिन’ ही लस टोचण्यात येणार आहे. शिर्डी उपविभागातील ४११५४ लाभार्थ्यांना ३२ केंद्राच्या माध्यमातून ही लस देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणाऐवजी ही लस संबंधित शाळा, महाविद्यालयातून मुलांना देण्यात येणार आहे. ८ जानेवारी २०२२ पर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या वयोगटातील मुलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिर्डी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत.
शिर्डी विभागातील कोपरगांव तालुक्यातील १९४१५ व राहाता तालुक्यातील २१७३९ लाभार्थी वयोगटाचे साधारणतः ३२ केंद्रावर (दिवसानुसार लसीकरण केंद्राची संख्या कमी जास्त होऊ शकते) लसीकरण होणार आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापराला परवानगी असल्याने केंद्रावर केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लसीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर अथवा महाविद्यालय ओळखपत्र असणे गरजेचे आहे. आजपासून वरील कागदपत्रे, शाळा अथवा महाविद्यालयात जाताना जवळ बाळगावे. जी मुले, मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील असून शाळा व कॉलेजमध्ये जात नाहीत. त्यांनी आपापल्या भागातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करून संबंधित जवळील शाळा, कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी लसीकरण सुरू असेल तेथे लस घेण्याबाबतची माहिती अवगत करून लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन ही शिर्डी उप विभागातील कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे व राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुका प्रशासनाच्या वतीने केले आहे.