पारनेरला किसान क्रांती फोरमची घोषणा …!

दत्ता ठुबे
पारनेर : गेल्या पाच वर्षांत निवडणुकांवेळी राज्यकर्त्यांनी जनतेला दिलेली कोणतीच आश्वासने पाळली नसल्याने त्यांचा नाकर्तेपणा उघड करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन किसान क्रांती फोरमची स्थापना करण्याची घोषणा पारनेर येथे करण्यात आली आहे.किसान मोर्चाचे बाळासाहेब पातारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार मंथन करण्यासाठी पारनेरला एक बैठक बोलावली होती . यावेळी तालुक्यातील क्रांतीकारी विचारांचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून राज्यकर्त्यांचे केवळ राजकारण चालु असून ते शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत.आता या राज्यकर्त्यांना त्यांच्या नाकर्तेपणाचा कळस झाला असुन आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.त्यासाठी पुढील वर्षी होत असणाऱ्या निवडणुकांच्या आधी जनजागृती करून मत मागण्यासाठी येणाऱ्या अशा लबाड पुढाऱ्यांना गावबंदी घालण्यात येईल . त्यासाठी ग्रामसभांचे ठराव देखील घेण्यात येवून ते सदरचे ठराव संबंधित लोकप्रतिनिधी, पुढारी व त्यांचे पक्ष प्रमुख यांना पाठवण्यात येतील. एवढे करूनही जर असे नाकर्ते पुढारी मत मागण्यासाठी गावात आले तर त्यांना किसान क्रांती फोरमचे कार्यकर्ते गावातुन पिटाळून लावतील तसेच त्यांच्या सभा देखील उधळून लावतील त्यासाठीचे नियोजन पुढील वर्षभर फोरम तर्फे करण्याचे करण्यात येईल असे अॅड.रामदास घावटे यांनी सांगितले .
शेतकर्यांना राज्यकर्त्यांनी परावलंबी व गुलाम बनवले आहे . शेतकऱ्यांना त्यांच्या मुलभुत हक्कांची जाणीवच नाही. शेतकरी व सर्वसामान्य नागरीक जोपर्यंत संविधान अभ्यासून योग्य लोकप्रतिनिधी निवडत नाहीत तो पर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनात बदल शक्य होणार नाही त्यासाठी जनजागृतीची मोहिम राबवून मतदाराला आधी जागृत करावे लागेल असे राजेंद्र करंदीकर यांनी सांगितले.
तर पुढील वर्षभरात या फोरमच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा असंतोष प्रकट करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देवू असे अविनाश देशमुख म्हणाले. आंबेडकर स्मारकातील या बैठकीला मंडलिक पिंपरकर, संतोष वाबळे,महेंद्र पांढरकर,तुकाराम खाडे, संजीवन पाडळे,सुनिल चौधरी,सचिन मुंजाळ,योगेश सोनवने,गोरख सोनवने,दत्ता करंदीकर,संपत पवार आदि उपस्थित होते .
