ग्रामीणमहाराष्ट्र

उंचखडक बु गावचा विजू दादा………

लहानपणापासून आमचा सर्वांचा तो दादा होता आणि मोठा झाल्यावर तो उंचखडक बु गावचा विजू दादा झाला.
माझे वडील राजूरला सत्यनिकेतन मध्ये नोकरी करत होते आणि त्याच परिसरात आम्ही राहायला होतो.मला अजून आठवते एकदा दादाचे आणि माझे भांडण झाले आणि मी त्याला दगड फेकून मारला. तो त्याच्या डोक्याला लागला.बारिक कोच पडली. रडत रडत तो आईकडे गेला.केस बाजूला करून तिन त्याच्या डोक्यात थोडं रक्त पाहिलं आणि मला चांगलेच बदडून काढले. माझ्यापेक्षा एक वर्षाने तो मोठा होता परंतु दादागिरी मात्र माझीच चालत होती.
बालवाडी ते तिसरी पर्यंतचे माझे शिक्षण आणि चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण राजूरला झाले. पिंटू घिगे, वैभव पिचड, जितेंद्र शिंदे, श्रीपाद कपिले, चंदू तारगे हे माझे वर्गमित्र. तर हेमंत पिचड, महेश पंडित, सुनील बेनके हे दादाचे वर्गमित्र…

नंतर आम्ही अकोल्यात शिफ्ट झालो. राजूरमधुनच वडीलांनी पत्रकारिता सुरू केली होती. तलवार नावाचा एक पेपर संगमनेरात निघत होता. त्याचं ते काम पाहत होते. अकोल्यात आल्यानंतर त्यांनी सर्वच दैनिकांची कामे सुरू केली. गणेश लॉन्ड्रीच्या माडीवर आम्ही राहत होतो. वडिलांनी पहिल्यांदा एक सेकंड हॅण्ड सायकल फिरण्यासाठी विकत घेतली. आम्हा भावंडांच्या दृष्टीने त्याकाळात विमान विकत घेतल्याचा तो आनंद होता. माझी चौथी अकोल्याच्या मराठी शाळेत सुरु झाली तर दादाची पाचवी मॉडर्न हायस्कूलमध्ये सुरू झाली. पंडित गुरुजींचे आणि आमचे राजूर पासूनच घरोब्याचे संबंध होते त्यामुळे सातवीनंतर आठवीला दादाला आणि महेशला प्रवरानगरला टेक्निकलला शिकायला टाकण्यात आले. सातवी नंतर मीही हट्ट करून तिकडेच शिकायला गेलो. सुरुवातीला दादाचा मला प्रवरानगरला येण्याला विरोध होता पण माझे हट्टापुढे तो मावळला .आम्ही दोघेही महात्मा गांधी विद्यालयात वस्तीगृहात राहू लागलो. महेशही होताच. या काळात आम्ही खूपच धमाल केली.
प्रवरानगरला दादा बरोबर चे दोन वर्ष माझ्या आयुष्यातली पर्वणी होती. त्याची कोणाशीही पटकन मैत्री व्हायची. तीही जीवाभावाची व्हायची. त्याचा स्वभावच तसा होता.शांत संयमी कुणाशीही भांडण-तंटा न करणारा.. प्रसंगी जिवाला जीव देणारा.त्यामुळे मित्र त्याच्यावर भरभरून प्रेम करत. त्याचे सर्वच मित्र माझे मित्र झाले. पण त्यामुळे त्याने कधीच जलस फील केलं नाही. हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.शाळेत तो तसा फार हुशार नव्हता दहावीला तो नापास झाला आणि मग त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं वडिलांनी त्याला लगेच शेतीवर पाठवले. तेव्हा पासून तो शेतीच पाहत होता
.
वडिलांनी शेती त्याच्या नावावर करून दिली आणी तिथेच घात झाला. वय ४९ असताना त्याने या जगातून एक्झीट घेतली. कुटुंबाला आणि सर्वांना सोडून तो एकाएकी देवाघरी गेला. त्याच अचानक जाणं खूपच वेदनादायी आणि दुःखदायक आहे. माझ्यापेक्षा तो मोठा होता तरी मी त्याला खूप झापायचो.तोही गपचूप ऐकून घ्यायचा. कधीही मला तो फिरून बोलला नाही. शेतीवर सुरुवातीपासून गडी होते. त्यामुळे काम करण्याची सवय त्याला कधी लागली नाही. दुधाचा जोड व्यवसाय थोड्याफार प्रमाणात केला. नंतर गावचा सरपंच झाला. तेथून पुढे खरी त्याची वाट लागायला सुरुवात झाली.राजकारणाने त्याला व्यसनाधीनतेकडे नेले. मी संगमनेरला शिफ्ट झाल्यामुळे नंतरच्या काळात त्याचा आणि माझा संपर्क कमी आला. 30 नोव्हेंबरला त्याच्या शेवटच्या मुलीचे लग्न होते. तेव्हा दोन दिवस साताऱ्याला तो माझ्याबरोबर होता. त्या दोन दिवसात त्याने माझं सर्व ऐकले.माझ्यासोबत असला की तो आनंदी असायचा. घरात फक्त तो मलाच घाबरायचा. मोठा असूनही त्याला माझा धाक होता. त्याला तसे मी कधीही काही कमी केले नाही. त्यामुळे कदाचित त्याचा तो भीतीयुक्त आदर असू शकतो. फार क्वचितच तो माझ्यावर फिरायचा. नाहीतर नेहमी तो संयमान वागायचा. माझा कधी कधी तोल जायचा आणि माझे शब्द त्याच्याशी बोलताना घसरायचे. परंतु तरीही तो सर्व विसरून पुन्हा माझ्याशी जसे काही झालेच नाही अशा पद्धतीने बोलायचं वागायचा. 30 नोव्हेंबरला त्याच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर येताना आम्ही एका धाब्यावर जेवलो ते आमचे शेवटचे सोबत चे जेवण. आसले गावात मुलीचे लग्न लावून आम्ही परतत होतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात विधिवत लग्न समारंभ पार पडला. मंदिर शिवकालीन होते. छत्रपती शिवाजी महाराजही या ठिकाणी दर्शनाला येत होते. अशा परिसरात दिवस कसा गेला ते आम्हालाही कळले नाही.येताना पुण्यात थांबायचे की संगमनेरला जायचे याबाबत आमचे एकमत होत नव्हते. शेवटी त्याचे मी ऐकले आणि संगमनेरला निघालो. रस्त्यात एकत्र जेवलो तेव्हा वाटलही नव्हत की पुन्हा अशा पद्धतीने कधी एकत्र जेवण होणार नाही. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट झालीच नाही. 23 जानेवारीला 2022 ला पहाटे साडेपाचला

फोन वाजला.. आणि दादा गेला हे वाक्य कानी पडलं. क्षणभर मला काहीच सुचेना. दादा गेल्याची बातमी ऐकून मन सुन्न झालं. त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण डोळ्यासमोर तरळत राहिले. खूपच लवकर त्याने या जगातून निरोप घेतला
. त्याला आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली…

शोकाकुल
😢😢😢
संजय भाऊसाहेब मंडलिक
आणि परिवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button