पर्यटनातुन स्थानिक आदिवासी बांधवांच्या उपजिविकेचा प्रश्न मार्गी लावू -अशोकराव भांगरे

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
पर्यटनातुन रोजगार निर्मितीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे हा उद्देश समोर ठेऊनआज सोमवारी शेंडी येथे यशवंत युथ फाउंडेशनच्या वतीने परीसरतील सर्व पर्यटन व्यावसायिकांची बैठक पार पडली
असुन या बैठकीत पर्यटनातुन स्थानिक आदिवासी बांधवांच्या उपजिविकेचा प्रश्न मार्गी लावत जास्तीत जास्त आर्थिक स्रोत कसा वाढविला जाईल यावर चर्चा झाली .
या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे , यशवंत फाऊंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष अमित भांगरे , शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अशासकीय सदस्य श्री शरद कुंदा ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अकोले तालुका अध्यक्ष श्री भानुदास तिकांडे , बाळासाहेब भांगरे , देवकर साहेब, तुकाराम गोरडे ,विकास बांगर ,रामनाथ शिंदे ,डॉ. रामहरी चौधरी व सुमारे २५० व्यावसायिक उपस्थित होते .
रोजगार निर्मितीसाठी आर्थिक भांडवल उभे करण्याचं काम यशवंत फौंडेशन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पर्यटन सहकारी संस्थेतून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत निधी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा कयास आहे. या संस्थेच्या माध्यमातून पर्यटन निवास , स्वच्छता गृह , दुकानदारी टपरी व पर्यटन क्षेत्रात महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी महिलांना अर्थसहाय्य ह्या सर्व गोष्टी अगदी सहज रित्या उपलब्ध होणार असल्याची माहीती अमित भांगरे यांनी आपल्या मनोगतात दिली .

वर्षानुवर्ष सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासी बांधव पर्यटनावर आपली उपजीविका भागवत असतात . पावसाच्या प्रमाणात अनियमितता असल्यामुळे शेतातील पीक प्रत्येक वेळी चांगले येईलच असे नाही. त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय म्हणून उपजीविकेसाठी पर्यटनावर आधारीत राहावे लागते . भंडारदरा – कळसुबाई हरिचंद्र गड या परिसरामध्ये रोज हजारो पर्यटक येत असतात . त्यामुळे पर्यटकांना जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांचा ओघ तालुक्यातील पर्यटन भागात वाढतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण उपक्रम भंडारद-याच्या आदिवासी भागांमध्ये राबविण्याचा मानस अशोकराव भांगरे यांनी असल्याचे सांगितले. पर्यटन हा विकासाचा आत्मा आहे. या सर्व गोष्टी करत असताना पर्यटन संदर्भात सर्व प्रकारचे परवाने आवश्यक आहेत .त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी फाउंडेशन कायम मेहनत घेत आहे. अगदी सहज रित्या सर्व प्रकारच्या सुविधा अडीअडचणी सोडवत असताना नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यासंदर्भात लवकरच संबंधित यंत्रणेला समोरासमोर चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे यावेळी आश्वासन दिले. वनविभागामार्फत वन विभागाच्या टोल नाक्यावर रिंगरोडवरील रहिवासी असलेल्या नातेवाईकांना देखील ये – जा करताना पैसे भरावे लागतात. तसेच या स्थानिक लोकांकडे ऑनलाईन बुकींग करून पर्यटक येत असतात .तेही पर्यटकांकडून टोल नाक्यावर पैसे घेत असल्याने पर्यटकांचा ओघ कमी होत आहे .हा.प्रश्न सुद्धा लवकरच सोडविण्यात येईल असे या बैठकीत ठरविण्यात आले.
