गोळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेला एक कोटी सात लाखाची मंजुरी – सौ.हर्षदाताई काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव जि.प.गटातील मौजे गोळेगाव येथील गाव व वाड्या वस्त्यासाठी जि.प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातुन जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यतेसह आज दि.१५ रोजीच्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून गोळेगाव येथील बर्डे वस्ती, धनगर वस्तीसह सर्वच वस्त्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता. महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र या योजनेमूळे तलाव क्षेत्रात नवीन विहीर व गावासाठी १ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकीसह ८ की.मी.ची पाईपलाईन व वाड्या वस्त्यासाठी ५० हजार लिटर क्षमतेची टाकी होणार असून गावची पिण्याच्या पाण्याची समस्या यामुळे कायमची सुटणार असून लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरुवात होईल असेही त्या बोलताना म्हणाल्या.