इतर

कोविडच्या काळात पत्रकारांचे काम कौतुकास्पद : तहसीलदार निकम

संगमनेर श्रमिक पत्रकार संघ; पदोन्नती प्राप्त पोलिसांसह शहरातील ज्येष्ठ संपादकांचा सन्मान सोहळा

संगमनेर, प्रतिनिधी
कोविड संक्रमणाच्या काळात देशभरात भितीदायक वातावरण निर्माण झालेले असतांना संगमनेरच्या पत्रकारांनी प्रशासनाच्या हातात हात घालून सामान्य नागरिकांना केलेली मदत, त्यांची सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे. प्रसंगी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाचे कान टोचणारे पत्रकार प्रशासनाकडून होणार्‍या चांगल्या कामाचे कौतुकही करतात. आजचा हा सोहळा हेच सांगणारा असून अशा प्रकारचे चित्र संगमनेर वगळता अन्य ठिकाणी अभावानेच दिसून येईल. हातात कायद्याचे शस्त्र असलेल्या पोलिसांचे, शब्द हेच शस्त्र असलेल्या पत्रकारांकडून झालेला सन्मान संगमनेरच्या प्रगल्भ पत्रकारितेचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अमोल निकम यांनी केले.

मंगळवारी (ता.17) येथील संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर खात्यातंर्गत परिक्षा उत्तीर्ण होवून उपनिरीक्षकपदी बढती प्राप्त करणार्‍या संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह गेली अनेक दशके पत्रकारितेच्या माध्यमातून संगमनेरकरांची सेवा करणार्‍या ज्येष्ठ संपादकांचा जीवन गौरव करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेटचे संस्थापक नितीन हासे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे व सचिव संजय आहिरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना तहसीलदार निकम यांनी प्रशासनाच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारी आणि प्रसंगी आपल्या लेखणीतून प्रशासनाचे कान टोचणारी पत्रकारिता आपण संगमनेरात अनुभवल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे कौतुक करतांनाच त्यांनी सोशल माध्यमांचा वापर वाढलेल्या एकविसाव्या शतकातील आव्हानेही विशद् केली. आजच्या पत्रकारितेचे आयाम बदलले असले तरीही जनतेचे मत तयार करणे आणि मतमतांतरे असलेली माणसं एकाच मंचावर आण्णयाचे मोठे काम श्रमिक पत्रकार संघाने केले आहे. त्यामुळे मजबुत लोकशाहीची बांधणी करतांना आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पोलीस व पत्रकारांचे नाते प्रसंग व परिस्थितीनुसार बदलते असल्याचे सांगतांना त्याला विळ्या-भोपळ्याची उपमा दिली. पत्रकार आणि पोलीस या दोन्ही घटकांमध्ये साम्य असल्याचे त्या म्हणाल्या. कर्तव्य बजावतांना पोलीस आणि पत्रकारांना वेळ आणि काळ यांचे भान नसते. त्यांना टीकाही सहन करावी लागते, त्यात तथ्य नसले तरीही त्यातून निर्माण होणार्‍या प्रसंगांचा सामना करावा लागतो. या दोन्ही घटकातील संवादाचा अभाव त्यांच्यात गैरसमज निर्माण करणारा ठरु शकतो असे सांगत त्यांनी या दोघातील सुसंवाद समाजासाठी पोषक असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकारांशिवाय पोलिसांचे चांगले काम जनतेसमोर जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

प्रमुख अतीथी नितीन हासे यांनी समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या घटकांचा सत्कार सोहळा अशा शब्दात या कार्यक्रमाचे कौतुक केले. चांगल्या कामांचे योग्यवेळी कौतुक झाले तर त्यातून सकारात्मक गोष्टी समोर येवू शकतात. समाजात जे चांगलं घडतंय त्याचे कौतुक करणे आणि चुकीच्या कामांना जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करीत असतात. आजचा हा सन्मान सोहळा त्याचाच परिपाक असल्याचे त्यांनी सांगितले. संजय आहिरे यांनी स्वागत केले, गोरक्षनाथ मदने यांनी प्रास्तविकातून संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतला. नितीन ओझा यांनी संपदकांच्या मानपत्राचे वाचन केले, श्याम तिवारी यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या सत्काराचे निवेदन केले. संदीप वाकचौरे यांनी सूत्रसंचालन तर आनंद गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या सोहळ्यात संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावणार्‍या राजेंद्रसिंह चौहाण (दैनिक आनंद), किसन हासे (दैनिक युवावार्ता) व शिवपालसिंह ठाकूर (दैनिक प्रवरातीर) या ज्येष्ठ संपादकांचा ‘जीवन गौरव’ तर राजेश उर्फ राजू गायकवाड, शिवाजी फटांगरे, उल्हास नवले, विजय खंडीझोड, अनिल मोरे, इस्माईल शेख, सुनील सरोदे, विजय परदेशी, बाळासाहेब यादव व साईनाथ तळेकर या संगमनेर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या व पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झालेल्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button