पुरुष प्रधान संस्कृती महिला विकासातील अडसर- ॲड. रंजना गवांदे

विलास तुपे
राजूर / प्रतिनिधी
परंपरागत विचारांनी स्त्रीला कायम दुय्यम मानले असून स्त्रीने आधुनिक विचारांचा स्वीकार करावा. चूल आणि मूल एवढेच महिलांचे स्थान मानल्याने महिलांचा समाजातील सहभाग कमी राहिलेला आहे. पुरुष प्रधान संस्कृती ही महीला विकासातील खरा अडसर आहे.असे प्रतिपादन ॲड.रंजना गवांदे यांनी केले. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय निर्भय कन्या अभियान शिबिरात उद्घाटनपर ” महिलांचे हक्क व कर्तव्य ” या विषयावरील प्रमुख भाषणात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री. टी.एन.कानवडे (सचिव, सत्यनिकेतन संस्था राजूर) हे उपस्थीत होते.आपल्या पुढील भाषणात त्या म्हणाल्या की,” कायदा हा सर्वाना समान असला तरी स्त्रीने मनाने निर्भय बनले पाहिजे. स्त्री स्वातंत्र्य आहेच पण समाज हा काही जाचक अटी स्त्रीवर लादत असतो. त्यासाठी स्त्रीने सत्याची कास धरावी सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे. यावेळी प्रमूख मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली या प्रसंगी या शिबिरात विविध महाविद्यालयातील एकुण १५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.या सर्व सहभागी विद्यार्थिनींना श्री.धिंदले (कराटे प्रशिक्षक) यांनी कराटे प्रशिक्षण दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. टी.एन.कानवडे म्हणाले की,”विद्यार्थीनींनी उच्च ध्येय समोर ठेवून स्वप्न पाहावे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याची काळजी घ्यावी.”
या शिबिरात दुपारच्या सत्रात प्राचार्य गुंफा कोकाटे यांनी ” महिला सक्षमीकरण काळाची गरज” या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी सामाजिक प्रबोधन गीते व कविता सादर करून सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. बी.एच.तेलोरे (समन्वयक विद्यार्थी विकास विभाग) यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ.एल.बी.काकडे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.व्ही.एन.गिते, डॉ.द.के.गंधारे, विद्यार्थिनी मंचाच्या अध्यक्षा डॉ.दीपमाला तांबे, प्रा.जे.डी.आरोटे, कनिष्ठ महाविद्यालाचे प्रा. जयश्री गवळी, प्रा. हांडे मॅडम, प्रा. ढगे मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
