रावळ काकांच्या मदतीला गावकरी धावले! भंडारदरा येथील घटना

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेंडी ( भंडारदरा ) येथे व्यापारी बांधवांनी एकत्र येत एका वयस्कर आणि गरीब व्यापा-याला संकटसमयी मदतीचा हात बहाल करत परत व्यापारासाठी उभे करत समाजासमोर आदर्श निर्माण करत आपली एक आगळी वेगळी ओळख परिसरात निर्माण केली आहे .
सविस्तर वृत्त असे की अकोले तालुक्यातील शेंडी ( भंडारदरा ) या गावामध्ये गोंविद रावळ या वयस्कर व्यक्तीचे भर चौकात दहा बाय दहाच्या जागेत छोटेशे स्टेशनरीचे दुकान आहे .हे दुकानात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी चोरी करत दुकातील सर्व वस्तु चोरुन नेल्या .रावळ यांची उपजिविकाच या दुकानावर अंवलंबुन असल्याने झालेल्या चोरीबद्दल शेंडीतील व्यापा-यासह सर्वानांच फार वाईट वाटले . त्यात गोंविंद रावळ ( काका ) यांचा स्वभाव अतिशय शांत असल्याने शेंडीचे सरपंच व हाॅटेल प्रवराचे संचालक दिलीप भांगरे यांनी सर्व व्यापा-यांना एकत्र करत यावर काही उपाय योजना करता येईल यासंदर्भात चर्चा केली . सर्व व्यापा-यांनी यथाशक्तीप्रमाणे मदत देण्याचे एकमत होताच तात्काळ निधी उभा करण्यात आला . बघता बघता तीन तासात २३हजार १११ रुपये जमा झाले .ते गोविंद रावळ यांना सरपंच दिलीप भांगरे व व्यापा-यांच्या हस्ते देण्यात आले .याही अगोदर अशाच प्रकारचा प्रसंग १९९८ साली कै.सुरेश घाटकर यांच्यावर आला होता . तर मागिल वर्षी भाऊसाहेब अवसरकर यांच्यावरही अशाच पद्धतीची वेळ आली होती.त्यावेळी दोन्ही व्यक्तींची दुकाने अचानक आग लागल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. तेव्हांही व्यापा-यांनी एकत्र येत निधी उभा करत वरिल व्यक्तींना मदतीचा हात बहाल केला होता . १९९८ साला पासुन सुरु झालेली परंपंरा आजही शेंडीतील व्यापारी वर्गाने टिकवुन ठेवली आहे . संकटसमयी गरजु व्यक्तींना धावुन जाण्याची शेंडीच्या व्यापा-यांची ही वृत्ती कौतुकास्पद असुन भंडारद-याच्या परीसरामध्ये व्यापा-यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .मदतनिधी जमा करण्यासाठी शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे , वैभव मेहता , अनिल अवसरकर , स्वप्निल शहा , रामेश्वर अवसरकर , पांडुशेट अवसरकर , मारुती मोरे , नितीन शहा , कैलास शहा , हेमंत अवसरकर , जवाहर ( पिंटुशेट ) शहा यांच्यासह सर्व शेंडीतील ईतर व्यापारी हजर होते . तर या झालेल्या चोरीची तक्रार राजुर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली असुन पुढील तपास राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक नितिन खैरणार , पो .काॅ. दिलीप डगळे , अशोक काळे हे करत आहेत .
शेंडी येथे गोविंद रावळ यांच्या दुकानात झालेला चोरीचा प्रकार निंदनीय असुन राजुर पोलिस स्टेशनकडुन लवकरच चोरीचा तपास लावण्यास येऊन गुन्हेगारांना अटक करण्यात येईल
…नरेंद्र साबळे
सहाय्यक पो.निरिक्षक , राजुर