अहमदनगर
पासांपेक्षा नापासांना अनेक रस्ते आहेत – सुदर्शन मुंढे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहरटाकळी, ता. शेवगाव येथे इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2022 साठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत केले. प्रथमत: विद्येची देवता सरस्वती, कर्मयोगी आबासाहेब काकडे व स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, अतिथी व सर्व गुरुजनांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शनजी मुंढे, पोलीस उपअधिक्षक, शेवगाव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खेड्यातील शाळाही कर्तुत्ववान असतात त्याचे शहरटाकळी विद्यालय हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कार्यक्रमाचे अप्रतिम नियोजन, विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे यातून त्याची प्रचिती आली. इयत्ता दहावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षा देणार आहेत. पालकांना शंका येतात की 40 टक्के वाले पुढे आपलं भविष्य घडवू शकत नाहीत, पण 40 टक्के वाला विद्यार्थी पण आईएएस, आयपीएस, पीएसआय, डॉक्टर, इंजिनीयर होऊ शकतो. पास झालेल्या पेक्षा नापास झालेले विद्यार्थी जास्त कर्तुत्वान असतात. त्यासंदर्भात काही उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये अशी एक ऊर्जा असते प्रेरणा असते की त्या प्रेरणेतून ते काहीही करू शकतात आणि कुठले काम आनंदाने करून यश संपादन करतात. नापास होणे म्हणजे आयुष्य संपले असे नाही नापास झाल्यावर आत्महत्या करणे हा या कारणावर पर्याय नाही. या उलट नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी अजून प्रयत्न करून जास्त गुण मिळवून दाखवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेवलं पाहिजे दहावी नापास झालेले पण जीवनात यशस्वी झालेले आहेत अशा यशस्वी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तींची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर यावेळी विशद केली. 'प्रयत्नांती परमेश्वर' त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण जेव्हा शिकतो, ज्ञान मिळवतो तेव्हा आपण प्रयत्नांच्या जवळ असतो. तसेच आयुष्यात नेहमी सत्याने वागावे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारी संकटे सिगारेट ओढणे,दारू पिणे, अशा संकटांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. आयुष्यात दहावीपर्यंतचा पहिला टप्पा हा खडतर असतो.दुसरा टप्पाही थोडा खडतर असतो पण शेवटचा टप्पा आपल्या आयुष्याला आनंद देणारा असतो. विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा मध्ये कॉपी करू नये. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी. हुशार विद्यार्थ्यांचे पाय जमिनीवर असावेत.
सुदर्शनजी मुंडे यांनी स्वतःची कष्टमय जीवन कहाणी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडली विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन विद्यालयाचे आभार व्यक्त केले.
प्राचार्य संपतराव दसपुते, शिक्षक प्रतिनिधी बाळकृष्ण ठोंबळ, सुरेखा शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आदित्य जगदाळे, समृद्धी शेटे, वैष्णवी नाबदे, आदित्य मनवेलीकर,कादंबरी राजळे, ज्ञानेश्वरी गोसावी, श्रुती माळवदे, कृष्णा विखे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य संपतराव दसपुते, पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत, अशोक काळोखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगल विखे, हरिभाऊ विखे, गणेश खंबरे, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व इयत्ता नववी, दहावी व अकरावी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाची विद्यार्थिनी विद्या बारवकर हिने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री वाकळे व समृद्धी सुरसे यांनी केले. आभार शित्रे साक्षी हिने व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी परिश्रम घेतले.सौ.हर्षदाताई काकडे व ॲड. विद्याधरजी काकडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.