गणोरे येथे धाडसी चोरीचा प्रयत्न फसला..
गणोरे प्रतिनिधी ( सुशांत आरोटे)
सोमवार रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अकोले गणोरे रस्त्याला असणाऱ्या चारंग बाबा मंदिर परिसर आणि ओढ्याला चोर असल्याची बातमी गावात वेगाने पसरली, चारंग बाबा मंदिर परिसरातील नागरिकांनी चोरांचा संशय असल्याचे जाणवले..चोर..चोर या आवाजाने त्या ठिकाणाहून नागरिकांनी बॅटरी ,काठी,घेत ओढ्याचे दिशेने पळत चोर शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु चोर अंबिका माता मंदिर देवस्थानच्या मागील बाजूस असणाऱ्या ओढ्याकडे अंधाराचा फायदा घेत पळाले.त्या ओढ्याचे दिशेने अंबिका माता मंदिर परिसराकडूनही अनेक तरुण हातात काठ्या घेऊन चोरांचा शोध घेत होती. चोर शोधता शोधता चोरांची गाडी नागरिकांच्या हाती लागली असता त्या गाडीची नागरिकांनी तपासणी केली असता त्या गाडीत चोरीच्या उद्देशाने आणलेली हत्यारे मिळून आली गाडीत कुऱ्हाडा आणि इतर साहित्य तसेच कोणत्या तरी मंदिरातील घंटा मिळून आल्याची माहिती मिळाली. सदर घंटा हा कोणत्या तरी मंदिरातील चोरल्याची शंका असून सदरचा घंटा हा गाडीच्या डिकीत सापडला असल्याचे नागरिकांनी सांगितले.रागाच्या भरात नागरिकांनी चोरांच्या गाडीचे प्रचंड नुकसान केले असल्याचे दिसून आले.परिसरात नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सदर चोर कुठे लपले याचा शोध लागला नाही.नागरिकांच्या म्हणण्यानुसार चार ते पाच हत्यार बंद चोर असल्याची माहिती मिळाली आहे.चोरीच्या उद्देशाने त्या ठिकाणीं सापडलेली एक मोटार सायकल ही विना क्रमांकाची मिळून आली आहे. सदर गाडी ताब्यात घेतली आहे.
इतक्या लवकर म्हणजे नागरिकांचा हा जेवणाचा वेळ असतो बरोबर हा वेळ साधत चोरांनी आपला डाव साधत आपला प्लॅन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्लॅन फसला आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनां डाव साधता आला नाही .अजून संपूर्ण उन्हाळा जायचं आहे तेच चोरीचे सत्र सुरू झाले आहे. या साठी गावागावात पोलीस स्टेशन आणि गावातील ग्रामपंचायत यांचे मार्फत गावात तरुणाची गस्ती पथक म्हणजेच ग्राम सुरक्षा रक्षक दल कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किंवा लष्करातील जवान यांचेमार्फत ग्राम सुरक्षा रक्षक दलाला ट्रेनिंग देऊन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे. अकोले पोलिसांनीही या परिसरात रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे आहे. चोरांचा सुळसुळाट होण्याआधीच पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती अथवा नाही या बाबत कुठलेही माहिती उपलब्ध झाली नाही.