राळेगणची बदनामी करून प्रसिद्धी चा खटाटोप

लोकजागृतीला राळेगणसिद्धीत उपोषणास विरोध … !
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात झालेला टॅंकर घोटाळा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आजी – माजी सहकारी दडपत असल्याचा आरोप करत लोकजागृती सामाजिक संस्थेने पुकारलेल्या उपोषणाला राळेगण-सिद्धी परिवाराने विरोध केला आहे .
येत्या अकरा तारखेपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण चालू करणार असल्याचे पत्र ग्रामपंचायत राळेगण सिध्दी ,अण्णा हजारे व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांना देण्यात आले होते . त्यानंतर तेथील सरपंच लाभेश औटी यांनी राळेगण येथे उपोषण करता येणार नाही असे
लोकजागृती सामाजिक संस्थेला पत्राने कळवले .
या सामाजिक संस्थेने राळेगण सिद्धीला उपोषन करणे व त्यांनी आम्हाला आमच्या गावातील एखाद्या विशिष्ट विषयावर ग्रामसभा बोलायला सांगणे म्हणजे आमच्या राळेगणसिद्धी परिवाराच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले आहे . जर घोटाळा झालाच असेल तर मग शासन दरबारी उपोषण करा असा सल्लाही त्यांनी पत्रात दिला आहे . अण्णा हजारेंच्या गावात उपोषण केल्यावर चांगली प्रसिद्धी मिळेल , या हेतूने ते आमच्या गावात उपोषण करत असल्याचा आरोप राळेगणचे सरपंच यांनी केला आहे . तसेच लोकजागृती सामाजिक संस्था या प्रकरणात आण्णा हजारे व राळेगणची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे .
राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटी यांनी पाठवलेले पत्र आम्हाला प्राप्त झालेले असून , लोकशाहीने आम्हाला दिलेल्या संविधानिक हक्कात आम्ही आमची बाजू उपोषणाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत . कुठेही उपोषण करण्याला कुणाच्या परवानगीची गरज नसते त्यांनी आम्हाला राळेगण-सिद्धी उपोषण करण्याला बंदी घालू नये ,असे करणे म्हणजे आमच्या हक्कावर गदा आहे . आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत .
संपूर्ण देशाला भ्रष्टाचामुक्तीचे धडे देणारे आज आपल्या गावातील घोटाळेबाजांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी एक झाले असल्याचे लोकजागृतीचे संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी सांगितले .