नाशिक रोटरीतर्फे ‘एक दिवस स्वप्नातला’१०० मुलांचा सहभाग

खेळ. नृत्य, संवाद अन आनंदी जीवनाने मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
नाशिक : आयुष्यात एकदा तरी एक दिवस स्वतःच्या मनाप्रमाणे घालवावा असं प्रत्येकालाच वाटतं. एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे आपले आयुष्यही असेच बहारदार आणि आनंदी झाले तर ते नवलच नाही का! ‘नाच रे मोरा नाच’, ‘ या गाण्यांवर ताल धरत सर्वांनी आयुष्यातील क्षण अविस्मरणीय करून टाकले. तसेच मान्यवरांशी गप्पा, गाण्यांचे रेकॉर्डिंग, हॉटेल टूर, ‘आरजे’शी संवाद, पोवाडा, गोंधळ, कथ्थक, धमाल नृत्य, मस्ती, लज्जतदार जेवणाने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
चिमुकल्यांना उच्च दर्जाच्या हॉटेलची सफर, तिथल्या सुख सोई, संस्कृती, शिस्त, परंपरा, जेवण, खेळ, मनोरंजन अशा विविध साधनांचा उपभोग केवळ स्वप्नात न घेता प्रत्यक्षात उपभोगण्याची संधी रोटरी क्लब ऑफ नाशिकने “एक दिवस स्वप्नातला” या उपक्रमाच्या माध्यमातून हॉटेल बीएलव्हिडीमध्ये सफर आयोजित केली होती. स्वप्ननगरीचा हा अनुभव घेण्यासाठी नाशिक शहरातील अण्णासाहेब वैशंपायन स्कूल, महात्मानगरच्या इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या मुला-मुलींना या आमंत्रित करण्यात आले होते. खेळांची रंगत, धमाल गाण्यांवर नृत्य, चटपटीत खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. या पार्टीत मुले उत्साहात सहभागी झाले आणि जाताना मिळालेले रिटर्न गिफ्टसुद्धा कुतूहलाचा विषय ठरला.
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद हेच यश
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना शहरी जनजीवन वातावरण सामाजिक बांधिलकी संस्कृती शिस्त परस्पर संवाद अशा विविध गोष्टींचे आकलन व्हावे आणि यातून त्यांचा सामाजिक विकास साधला जावा या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन केले. मुलांना उच्चभ्रू हॉटेलचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांच्या आनंदासाठी सर्वकाही करण्याचा विचार मनात होता. त्यामधून ही कल्पना सुचली. १०० मुलांनी पार्टीत सक्रिय सहभाग नोंदवत मजा लुटली यात आमच्या आयोजनाचे यश आहे.
- प्रफुल बरडिया, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नाशिक
काय ते हॉटेल…., काय तिथल्या सुविधा…, काय ती धमाल
अबब…काय ते हॉटेल…., काय तिथल्या सुविधा…., काय तो हॉल…., काय ते किचन… , काय ते खेळ…, काय तिथल्या संगीताची कमाल…., अन् काय ते जेवण… आतापर्यंत आम्हाला अशा हॉटेलमध्ये जाण्याचा कधी योगच आला नव्हता. पण कधीतरी स्वप्नात पाहिलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन तिथली जीवनशैली अनुभवण्याची संधी रोटरी क्लबने दिली याचा खूप आनंद वाटतो. स्वप्नातल्या दिवसातून आम्हाला शिकायला मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सकाळी अध्यक्ष प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, लिटरसी संचालक उर्मी दिनानी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. रोटरी म्हणजे काय ? इंटरॅक्ट क्लब कसे असते, एक दिवस स्वप्नातला, आपण हा आजचा दिवस कशासाठी करतो? कार्यक्रमाची रूपरेषा मुलांना सांगितली. अतिशय सुंदर पद्धतीने रुचकर नाश्ता आणि वेलकम ड्रिंक घेऊन मुलांना बीएलव्हीडी हॉटेलची सफर घडवून आणली. अतिशय हसत खेळत, बहारदार शैलीत मुलांना खिळवून ठेवले ते आर जे रुद्र आणि अमोल यांनी! अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम अतिशय छान सादर केला. मुलांच्या आवडीचे रुचकर भोजन घेत घेत सर्व मुलांनी एकमेकांशी गप्पा मारत भोजनाचा कार्यक्रम पार पडला. लाईफ कोच सागर व शरयू भदाने यांनी मुलांना आयुष्यातली स्वप्नांचे कागदावर रेखाटन करून ते पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत हे समजावून सांगितले.
कार्यक्रमास प्रोग्रॅम कमिटी चेअर शिल्पा पारख, मंथ डायरेक्टर सुचेता महादेवकर, इंटरॅक्ट डायरेक्टर किर्ती टाक, मंथ लिडर हेतल गाला आणि वंदना सम्मनवार यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे दमयंती बरडीया, विनायक आणि ऊर्मिला देवधर, दिलीपसिंह बेनिवाल, डॉ. बुरड यांनी उस्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.