रोटरी क्लबचा जीवन गौरव पुरस्कार मिलिंद कुलकर्णी यांना जाहीर; मंगळवारी होणार वितरण

नाशिक : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार दैनिक लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (दि २१) रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संतोष साबळे यांनी गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली.
गेल्या ८० वर्षांपासून रोटरी क्लब ही संस्था लोक विकासासाठी कार्य करीत आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात समाजाभिमुख काम करणाऱ्या या संस्थेने आजवर नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. विशेषत: ग्रामविकासावर भर दिला आहे. या कार्यात माध्यमांचे योगदानही महत्त्वाचे राहिले आहे. म्हणूनच समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून रोटरी क्लबतर्फे या वर्षापासून पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ संपादक असलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्याच्या भावनेतून गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रातील एका ज्येष्ठ संपादकास जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार दैनिक लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे माजी संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यावेळी विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचाही सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक व माध्यम क्षेत्रातील मान्यवर तसेच नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत, मानद सचिव शिल्पा पारख, हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक निलेश सोनजे, दमयंती बरडीया,अॅड विदुलता तातेड आदींनी केले आहे.