इतर

मोबाईलचा अतिरिक्त वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता: हे अंध:कारमय आव्हान!-सत्यजित भटकळ

दि.२ पारनेर प्रतिनिधी
उत्पातकारी हवामान बदल, मोबाईलचा अतिरिक्त वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी अस्तित्व आणि पृथ्वीचे भविष्य अंध:कारमय केले आहे. या संकटांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक माणूस, विविध देश आणि तेथील शासनयंत्रणा यांची भक्कम आणि कृतिशील वज्रमूठ बनवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी येथे केले.

   भटकळ यांनी हे मत 'स्नेहालय' संस्थेच्या ३६ वर्षांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या इंग्रजी पुस्तकाच्या फिटे अंधाराचे जाळे या मराठी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात मांडले. यावेळी सत्यमेव जयते टी.व्ही.शोच्या सहदिग्दर्शक आणि संशोधन प्रमुख सौ. स्वाती भटकळ उपस्थित होत्या. भटकळ म्हणाले की, हवामान बदलामुळे यंदा महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थकारणाला मोठा धक्का बसला. दुष्काळी पट्ट्यात पाऊस आणि पुराने हाहा:कार उडवला. हे दुष्टचक्र आता अपवाद ठरणार नसून सातत्याने अशा संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. हवामान बदलाचा उत्पात आता सुरू झाला आहे.

मोबाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या गैरवापरातून तयार होणाऱ्या भयावह विकृती मानवी सहजीवनातील परस्पर संवाद, विश्वास आणि माणुसकी यांचा विनाश घडवून आणत आहेत. या प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक संवाद आणि सामूहिक कृतीकरीता तरुणाईने आणि सामाजिक संस्थांनी आग्रही व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासून स्नेहालय संस्थेने दिलेल्या निरपेक्ष सहयोगाचा आढावा घेऊन भटकळ यांनी नमूद केले की, सामाजिक आणि सेवाक्षेत्रात स्नेहालयने आपल्या नैतिक मूल्यांना आणि समावेशक भूमिकेला असामान्य निष्ठेने जपले आहे. अन्य शेकडो संस्थांना आणि कार्यकर्त्यांना आपली संसाधने, अनुभव, तंत्र – मंत्र यांची विश्वस्त भावनेतून मदत देणारे स्नेहालय सेवाकार्याची आध्यात्मिक मातृशक्ती आहे.सौ. स्वाती भटकळ यांनी स्नेहालय परिवार मागील १६ वर्षांपासून आपले माहेर असल्याचे सांगत, सत्यमेव जयते करिता सामाजिक प्रश्नांवर संशोधन करत असताना स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भात स्नेहांकुर उपक्रमाने केलेले काम देशासाठी दिशादर्शक ठरले असे नमूद केले.’फिटे अंधाराचे जाळे’ -असामान्यत्व आणि देवत्वाची अनुभूती यावेळी अप अगेन्स्ट डार्कनेस च्या लेखिका मेधा देशमुख भास्करन आणि अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांची प्रकट मुलाखत प्रा. डॉ. दया भोर यांनी घेतली.

लेखिका मेधा देशमुख भास्करन यांनी सांगितले की, एड्समुळे सडलेल्या, बहिष्कृत वेश्यांना आपली बहीण किंवा आई समजून त्यांची सेवा डॉ. गिरीश, डॉ. प्राजक्ता, कुलकर्णी परिवार आणि टीम स्नेहालयने केली. करुणा, दया, दान यांच्यापलीकडे जाणाऱ्या या माणुसकीच्या कृतीने थक्क केल्याने पुस्तकाचे संशोधन करण्याची उर्मी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे असामान्यत्व आणि देवत्व यांची अनुभूती स्नेहालयाच्या कामातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.अनुवादिका श्रीमती सुनंदा अमरापूरकर म्हणाल्या की, नगरमधील संवेदनशील मुलांची निःस्वार्थ धडपड असलेल्या स्नेहालयशी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्यामुळे नाते जुळले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या मानवतेवरील संतवचनांवर स्नेहालयने थेट कृती केली. महिला आणि बाल हक्कांपासून ते मानसिक आरोग्य आणि पर्यावरणापर्यंत पथदर्शी २७ सेवा प्रकल्प उभे करणाऱ्या स्नेहालय टीमची असामान्य कल्पकता आणि धाडस अनुवाद करताना मानवतेची दिव्य दृष्टी देत गेल्याचे त्यांनी सांगितले.

लेखिका आणि अनुवादिका ज्याप्रमाणे अहिल्यानगरच्या आहेत त्याप्रमाणेच आपलेही आजोळ अहिल्यानगर असल्याचे सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापक आशुतोष रामगीर यांनी सांगितले.फिटे अंधाराचे जाळे या पुस्तकाचे रेडिओ नगर 90.4 एफएम या चॅनलवरून दररोज रीमा अमरापूरकर यांनी केलेले अभिवाचन प्रसारित होते. लवकरच याचे ध्वनीपुस्तक उपलब्ध होणार असल्याची माहिती रेडिओ नगरचे संपादक भूषण देशमुख यांनी दिली.
डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीबाबत भूमिका मांडली.यावेळी स्नेहालयच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, मंगलताई अहिरे, संस्थेच्या आजीव सदस्य आणि विश्वस्त असलेल्या वंचित समूहातील महिला, माजी विद्यार्थी, संस्थेचे जुने व नवे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button