मांडओहळ धरण क्षेत्रातील शेतीचा वीज पुरवठा सुरळीत करा ; अन्यथा तीव्र आंदोलन-सुजित झावरे पाटील

वीज तोडल्यामुळे हातातोंडाशी आलेले पिके जळण्याची भीती
पारनेर/प्रतिनिधी :
मांडओहळ धरण क्षेत्रातील कर्जुले हर्या, गुरेवाडी, भोरवाडी, कन्हेर, कामटवाडी, वासुंदे या भागातील शेती पिकाची तोडलेली वीज लवकर जोडणी न केल्यास पारनेर तहसील समोर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिला आहे.
दुष्काळी तालुका म्हणून पारनेरची ओळख आहे. तालुक्याच्या उत्तरेला वरदान असलेल्या अर्धा टीएमसी पेक्षा कमी अशा मांडओहळ धरण प्रकल्प क्षेत्रातील पाणीसाठा आता ४२% टक्के शिल्लक असून या भागातील शेती साठी एक अवर्तन अजून देणे शक्य असतानाही स्थानिक तहसील प्रशासनाने पाणी टंचाईचे कारण देत शेतीसाठीची वीज महावितरण प्रशासनाला तोडण्याचे आदेश दिले व वीज तोडली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आता जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मांडओहोळ धरणांमध्ये ४२% टक्के पाणीसाठा शिल्लक असून व एक आवर्तन आपण शेतकऱ्यांना देऊ शकत असतानाही तहसील प्रशासनाने व महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज तोडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न केला आहे. तो चुकीचा आहे. यापूर्वी तालुक्याने अनेक दुष्काळ पाहिले आहेत. मांडओहोळ प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याची समस्या सोडवलेली आहे. शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवली आहे.
परंतु पाण्याची सद्य परिस्थिती चांगली असतानाही हा जो वीज तोडणीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या भागामध्ये आज शेतकऱ्यांची कांदा, भुईमूग, टोमॅटो, मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात असून अशा पद्धतीने जर वीज तोडली तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण ? असणार असा प्रश्न जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने दोन दिवसांमध्ये शेती पिकाची वीज जोडणी करण्याचा योग्य तो निर्णय न घेतल्यास पारनेर तहसील समोर शेतकऱ्यांसमवेत आम्ही आक्रमक आंदोलन करू अशी भूमिका सुजीत झावरे पाटील यांनी घेतली आहे.