संगमनेर मध्ये भव्य श्रीराम कथेचे आयोजन

संगमनेर प्रतिनिधी
प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने आणि संगमनेरांच्या सहकार्याने येत्या १ एप्रिल २०२५ पासून ते ९ एप्रिल २०२५ पर्यंत भव्य श्री राम कथा सोहळ्याचे संगमनेर नगरीमधील मालपाणी लाॅन्स या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. परम पूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य संगमनेरकरांना प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनांचा आनंद देखील लुटण्यास मिळणार आहे.
श्रीराम कथा श्रवानाने जगण्याचे सार समजते, छोट्या-मोठ्या घटनांपासून मानवाला दिशा दाखवते. श्री राम कथा ही साक्षात भक्ती-ज्ञान-वैराग्याचे, विद्वत्तेचे आणि मर्यादेचे स्त्रोत आहे. नऊ दिवस चालणारा हा उत्सव आपल्या सर्वांना संत दर्शन, हर्षउल्हास, समागम व आनंदाच्या एक अलौकिक संगमाकडे घेऊन जाणार आहे.
यानिमित्त दिनांक – १ एप्रिल, मंगळवारी सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी श्री राम कथा माहत्म्य याद्वारे श्री राम कथा सोहळ्यास सुरुवात होणार आहे. या कथेदरम्यानच रामनवमीचा पावन पर्व असल्याने भाविकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. कथेदरम्यान भव्य राम सीता विवाहोत्सव संपन्न होणार आहे. तसेच श्री राधाकृष्णजी महाराज युवकां सोबत स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.
दिवस दुसराः श्री शिव-पार्वती विवाह, दिवस तिसराः श्री राम जन्मोत्सव, दिवस चौथाः बाल लीला व धनुष यज्ञ, दिवस पाचवाः श्री राम-जानकी विवाह, दिवस सहावाः वनवास प्रसंग व केवट संवाद, दिवस सातवाः श्री राम-भरत व श्री राम-शबरी भेट, दिवस आठवाः हनुमान चरित्र व लंका विजय, तर नवव्या दिवशी श्री राम राज्याभिषेक सोहळा होणार आहे. या राम कथेचे सात सोपान असून यात बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड,
किष्किन्धाकाण्ड, सुन्दरकाण्ड, लंकाकाण्ड, उत्तरकाण्ड यांचा समावेश आहे. या श्रीराम कथा श्रवणाचा श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम कथा आयोजन समितीने केले आहे.