
दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
ट्रकचा व्यवसाय करण्यासाठी दर दरमहा पंधरा हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे व शुभम देशमुख तसेच इतर दोघांवर खंडणी तसेच इतर विविध कलमांन्वये पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण गायकवाड (रा. तराळवाडी ता. पारनेर ) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की ,दि.१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्याकडील ट्रकमध्ये एम.आय.डी.सी.मधील माल भरण्यासाठी निघालो असता पारनेर येथील कन्हेर ओहळ येथे युवराज पठारे व शुभम देशमुख (दोघेही रा. पारनेर ) हे भेटले. ते म्हणाले, तुला जर तुझ्या गाडया चालवायच्या असतील तर पंधरा हजार रूपये महिन्याप्रमाणे आम्हाला हप्ता द्यावा लागेल. आम्ही तुला अडचण येऊ देणार नाही. तु हप्ता दिला नाहीस तर तुला आम्ही तुझ्या गाडया चालवू देणार नाही. मला कोणाचाही आधार नसल्याने भीतीपोटी मी त्यांना पैसे देण्याचे कबुल केेले. त्यानंतर दि.१५एप्रिल २०२१ रोजी त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळीही मी त्यांना पैसे देऊ शकलो नाही. त्यावेळीही दोघांनी दमदाटी केली. त्यानंतर शुभम देशमुख याच्या फोन पे नंबरवर वेळोवेळी ११ वेळा एकूण १ लाख ८७ हजार ५०० रूपये पाठविले.
एप्रिल २०२२ या महिन्याचा हप्ता दिला नाही म्हणून युवराज पठारे याने दि. १३ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. माइयाकडे सध्या पैसे नाहीत असे सांगितले असता त्याने गाडी लाऊन घेण्याची धमकी दिली होती. त्याच दिवशी देवीभोयरे फाटा येथील क्रांती शुगर येथे साखर वाहतूक करण्यासाठी ट्रक क्र. एम. एच.१६ सी. सी.७१३३ घेऊन गेलो होतो. ट्रक भरण्यासाठी लावण्यात आल्यानंतर मदतनीसास तेथे थांबवून मी परत पारनेरला आलो. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मदतनीसाने गाडी भरून गेटबाहेर आणून उभी केल्याचा निरोप दिल्यानंतर मित्र प्रवीण शेरकर याच्यासोबत पुन्हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेलो.
ट्रक घेऊन मुंबईकडे निघाल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास युवराज पठारे, शुभम देशमुख, मयुर चौरे व गणेश पठारे यांनी ट्रक अडविली. ट्रकखाली ओढून मारहाण करण्यात आली. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्याच दरम्यान शुभम देशमुख याने खिशातील ३० हजार रूपये, गळयातील चेन काढून घेतली. शिविगाळ करीत गावात आमच्या शब्दाच्या पुढे कोणी जात नाही, तु आम्हाला क्रॉस जातो काय ? असे ते म्हणाले. देशमुख याने ट्रकमधील चेकबुकही काढून घेतले. त्यातील काही चेकवर सह्या करण्यात आलेल्या होत्या. पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकू, तुझ्या गाडया अजिबात चालू देणार नाही अशी धमकी युवराज पठारे व शुभम देशमुख यांनी दिली.
त्यानंतर शुभम देशमुख ट्रक घेऊन पारनेरच्या दिशेने निघाला. त्यावेळी पारनेर पोलिस स्टेशनला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहीती आपण पोलिसांना दिली. रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान पुणेवाडी फाट्याच्या दरम्यान डिझेल संपल्याने ट्रक बंद पडली. मी तेथे पोहचलो. त्यावेळी पोलिसांचे वाहन तेथे पोहचले. त्यावेळी तेथे मयुर चौरे हा एकटाच तेथे होता. इतर लोक निघून गेले होते. मयुर चौरे याने ट्रकची चावी माझ्याकडे सुपूर्द करून तुझे पैसे व सर्व वस्तू परत मिळतील असे सांगितले. पोलिसांनी काही तक्रार असल्यास पोलिस स्टेशनला नोंदविण्याचा सल्ला दिला होता. मात्र दमदाटीमुळे आपण घाबरलो होतो असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
काढून घेण्यात आलेेले पैसे, सोन्याची चेन तसेच चेकबुक परत घेण्यासंदर्भात दि. १५ मे रोजी युवराज पठारे यास फोन केला असा त्याने नंतर पाहू असे सांगितले. शुभम देशमुख याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे पैसे हप्त्याचे आले असे समज असे सांगत पुन्हा दमदाटी केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित नसल्याने नगर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर आपण फिर्याद दाखल करीत असल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत नमुद केले आहे.
प्रविण पोपट गायकवाड यांच्या फिर्यादीवरून युवराज कुंडलिक पठारे, शुभम यशवंत देशमुख, मयुर शिवा चौरे व गणेश पठारे (सर्व रा. पारनेर ) यांच्या विरोधात मालमत्ता किंवा मुल्यमापन रोखा जबरीने घेण्यासाठी अथवा जे अवैध आहे किंवा ज्यामुळे एखादा अपराध करणे सुकर होऊ शकेल असे काहीही करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, व्यक्तीस गैरपणे निरूध्द करणे, बलदाग्रहण , इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे,शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा दाखविणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.