भंडारद-याच्या बाजारपेठेत करवंदांचे आगमन !

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या घाटमाथ्यावर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘ ‘ डोंगरची काळी मैना ‘ म्हणुन ओळख असलेली करवंदे पिकण्यास सुरुवात झाली असुन भंडारद-याच्या बाजारपेठेतही करवंदांचे आगमन झाले आहे .
अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणा-या कळसुबाई-हरिश्चंद्रगडाच्या अभयारण्यात मे महिण्याच्या दुस-या आठवड्यात करवंदाच्या काळ्याभोर जाळ्या पिकण्यास सुरुवात झाली असुन ही पिकलेली करवंदे आता भंडारद-याच्या दिशेने बाजारपेठेत विकण्यासाठी येऊ लागली आहेत . चवीने आबंटगोड असणारे काळेभोर हे फळ कुणालाही मोहात पाडणारे असुन कळसुबाईचा डोंगर , पाबरगड , रतनगड , अंलग व कुलंगगड तसेच घाटघर, उडदावणे , पांजरे , मुतखेल , कोलटेंबे या परिसरातील डोंगरावरही डोंगरची काळी मैनेच्या जाळ्या भरगच्च फळांनी लगडलेल्या नुकत्याच दिसु लागल्या आहेत . यावर्षी करवंदे विकणारी मुले कमी असली तरी वाकी तसेच कळसुबाई च्या परीसरात भरधाव जाणा-या वाहनांना काही मुलांचे समुह करवंदे खरेदी करण्यासाठी साद घालत आहेत . तर बरीचशी करवंदे विकणारी मुले पर्यटकांची गाडी दिसल्यास त्या गाडी भोवती गराडा घालत करवंदे खरेदी करण्याचा आग्रह धरताना दिसुन येत आहेत .ज्या मुलाची करवंदे पर्यटक पैशाच्या मोबदल्यात खरेदी करतात , त्या मुलाला आभाळ ठेंगणे होते .
भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवरील घाटघर , उडदावणे या गावांमध्ये दरवर्षीच अकोले – संगमनेर भागातुन करवंदे खरेदी करण्यासाठी व्यापारी दाखल होत असतात .हे व्यापारी अगदी अल्पदरात म्हणजेत दहा – पंधरा रुपयात एक किलो करवंदे खरेदी करतात. अशा पद्धतीने संपुर्ण परीसरात ते शेकडो किलो करवंदे कवडी मोल भावात खरेदी करुन शहरी भागात मात्र अव्वाच्या सव्वा भावात विकुन मलीदा खात असतात .या करवंदांना कमीत कमी ५० रु. किलो प्रमाणे भाव देण्यात यावा अशी मागणी या परीसरात करवंदे तोडुन आपला उदरनिर्वाह करणारे आदिवासी बांधव करत आहेत . तसेच ईगतपुरी परीसरातुन काही पिक अप गाड्या भरुन व्यक्ती करवंदे तोडण्यासाठी येत असुन ते करवंदाच्या झाडालाच घाव घालत असुन जाळ्या उध्वस्त करत असल्याचे निदर्शनास आले आहे . या पिकअप गाड्यांवरच वनविभागाने बंदी घालणे जरुरीचे आहे .