पारनेर तालुक्यातील तरुणाची साता समुद्रापार रेशीम गाठ!

बहिरोबावाडी गावात आली फॉरेनची पाटलीन !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी गावात फॉरेनची पाटलीन आली आहे या गावातील माजी सैनिक अर्जुन देठे पाटील यांचे द्वितीय सुपुत्र इंजिनिअर विकास याचा २५ मे रोजी अमेरिका येथील स्मित हक यांची सुकन्या इंजिनिअर स्टेफनी हिच्याबरोबर नगर येथील द्वारका लाॅन्स येथे शुभविवाह संपन्न झाला
. तालुक्यात यापुर्वी गोरेगाव, भनगडेवाडी येथे परदेशी मुली सुना म्हणुन आलेल्या असताना आता बहिरोबावाडी सारख्या अतिशय छोट्याशा गावात देखील देठे पाटील परिवाराने अमेरिका येथील युवतीला आपली सुन म्हणुन स्विकारले आहे. हा शुभविवाह सोहळा मोठ्या थाटामाटात नगर येथील द्वारका लाॅन्स येथे संपन्न झाला.
बहिरोबावाडी येथील माजी सैनिक अर्जुन देठे पाटील हे नौदलातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एका नामांकित कंपनीत दुसऱ्यांदा नोकरी करण्यास सुरुवात केली त्यांना विशाल व विकास अशी दोन मुले आहेत दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देत त्यांनी इंजिनिअर केले.त्यांचा द्वितीय चिरंजीव विकास याने संगणक अभियांत्रिकी पदवी मुंबई विद्यापीठातुन मिळवली व एमएस ही पदवी डॅलस येथील टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. व २०१६ ला विकास याने डेन्व्हर कोलोरॅडो , अमेरिका येथे ट्रेडेन्स या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक या पदावर काम करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान विकास व अमेरिका येथील युवती स्टेफनी यांचा परिचय होऊन मैञीत रूपांतर झाले पुढे दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले. स्टेफनी जेम्स हक यांच्या द्वितीय कन्या असुन त्यांनी देखील डेन्व्हर विद्यापीठातुन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स व बोस्टन विद्यापीठातुन मास्टर्स इन थिएटर , नॉर्दर्न कोलोरॅडो विद्यापीठातुन बॅचलर ऑफ आर्ट्स ह्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. सध्या स्टेफनी या ऍमेझॉन या कंपनीत उत्पादन विपणन व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.
अमेरिका व भारत या देशांची संस्कृती, धर्म, भाषा भिन्न असताना देखील या दोघांच्याही कुटुंबाने या विवाहासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता संमती देत एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. हा विवाहसोहळा २५ मे रोजी नगर येथील द्वारका लाॅन्स येथे संपन्न झाला या शुभविवाहासाठी तालुक्यातील विविध क्षेञात कार्यरत असलेल्या मान्यवरांबरोबरच नातेवाईक , मिञ परिवार व किन्ही – बहिरोबावाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.