पारनेर येथे शरद युवा संवादयात्रेचा प्रारंभ

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
शरद पवारांच्या मनात बसलेला माणूस कधी कुठे जाईल हे सांगता येत नाही. त्यांच्या मनात बसणे म्हणजे मंत्रिपदाच्या ५० लाल दिव्यांपेक्षा मोठे आहे. आमदार नीलेश लंके साहेबांच्या मनात बसले आहेत, असे कौतुकोद्गार राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केले.पारनेर येथे आयोजित शरद युवा संवादयात्रेनिमित्त शेख बोलत होते.
यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी सभापती गंगाराम बेलकर, रा. या. औटी, युवती अध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष बावाजी तरटे, युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे, सचिन पठारे, अॅड. राहुल झावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, नितीन अडसूळ, अशोक घुले उपस्थित होते.
शेख म्हणाले, की साहेबांच्या मनात खूप कमी माणसे बसतात. त्यांपैकी आमदार लंके एक आहेत. महाबळेश्वर येथे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतले. त्यावेळी मोठमोठ्या मंत्र्यांची नावे होती. ती पाहिल्यानंतर पवार साहेबांनी लंके यांना का नाही बोलावले, असे विचारले. महाराष्ट्रातील युवकांनी लंके यांच्यासारखे काम केले पाहिजे. तेच मंत्रिपदापेक्षाही जास्त मोठे आहे. पवार यांनी राजकारणात कधीच जातिवाद केला नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष शेख व आमदार लंके यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना पदाचे गांभीर्य आहे का?
प्रत्येक बूथवर युवक राष्ट्रवादीची कमिटी असली पाहिजे. गावागावांत युवकांनी पुढे आले पाहिजे. तालुका कार्यकारिणीतील १४ पैकी फक्त चारच पदाधिकारी उपस्थित असल्याने, शेख यांनी युवक अध्यक्ष विक्रम कळमकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ज्यांना पदे दिली, त्यांना गांभीर्य आहे का? त्यांना बैठकीला येण्यास वेळ नसेल तर ते लोकांसमोर कसे जाणार, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.
तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मेळावा
मेहबूब शेख यांच्याशी माझी वेगळी अटॅचमेंट आहे. पक्षासाठी पूर्ण वाहून घेतले, असा युवा नेता पाहिला नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे युवक राष्ट्रवादीकडे आकर्षित होतात. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी राज्यात झाला नसेल, असा मेळावा शेख यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये घेणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.