माजी मंत्री राम शिंदेंना लागणार राज्यसभेची लाॅटरी ?

दत्ता ठुबे/ पारनेर :
राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यामुळे भाजपचा तिसरा उमेदवार कोण असणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, माजी खासदार धनंजय महाडिक या तीन नेत्यांची नावे सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत अशी माहिती समोर येत आहे. शिंदे, महाडिक, बोंडे या तीन नावांपैकी कोणत्या दोन नावांवर भाजपकडून शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा राज्याचे माजीमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असलेले राम शिंदे हे धनगर समाजातील महत्त्वाचे मोठे नेते आहेत. राज्यात त्यांना मानणारा वर्ग आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून शिंदे त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. शिंदे हे सध्या पक्षसंघटनेत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पक्षसंघटनेत प्रामाणिकपणे काम करणारा निष्ठावंत नेता म्हणून शिंदे हे राजकीय वर्तुळात ओळखले जातात.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये जे मोजके नेते आहेत त्यामध्ये राम शिंदे यांना ओळखले जाते. ओबीसी नेतृत्व असलेल्या राम शिंदे यांना राजकीय ताकद देऊन राज्यसभेत पाठवल्यास राज्यातील धनगर समाज आणि ओबीसी समाज भाजप बरोबर राहण्याचा मोठी मदत होणार आहे. राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो.
माजी मंत्री राम शिंदे यांना राज्यसभेची लॉटरी लागणार असल्याची चर्चा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. अहमदनगर जिल्हा भाजप मध्ये सध्या शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिंदे यांना खासदार केल्यास अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.
राम शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तुळात रंगु लागल्याने सध्या शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.